जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील वसंतवाडी येथील प्रेमराज ठाकूर राठोड (वय४०) या शेतमजूराने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज शुक्रवारी उघडकीस आली. आत्महत्यामागील कारण अद्यापही कळू शकले नसून या याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
वसंतवाडी येथे प्रेमराज राठोड हे पत्नी व दोन मुलांसह वास्तव्यास होते. शेतमजुरी करून कुटुंबाचा ते उदरनिर्वाह करायचे. पत्नी बाहेरगावी गेली होती. त्यामुळे ते व त्यांचे मुले हे घरी होते. दरम्यान, शुक्रवारी सकाळी दोन्ही मुले कामाला निघून गेले़ त्यातच घरात कुणी नसताना प्रेमराज राठोड यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. काही चिमुकले राठोड यांच्या घराबाहेर लपाछपी खेळीत होते. एक चिमुकला हा राठोड यांच्या घराकडे लपण्यासाठी आला.
त्यावेळी त्याला काचेतून राठोड हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. त्याने लागलीच परिसरातील नागरिकांना ही बाब सांगितली. परिसरातील नागरिकांनी त्याठिकाणी धाव घेऊन घटनेची माहिती पोलिसांना दिली. काहीवेळानंतर एमआयडीसी पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते. पंचनामा झाल्यानंतर मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.