मुंबई, : राज्यातील ३ लाख युवक-युवतींना पुढील ३ वर्षाच्या कालावधीत बँकींग, फायनान्स सर्व्हिसेस, इन्शुरन्स या विषयातील प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी आणि केंद्र शासनाच्या द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) यांच्यामध्ये सामंजस्य करार देखील करण्यात आला असून जीएसटी, आयकर आदींविषयक सेवा पुरवठ्याची गरज वाढलेली असताना राज्यातील युवक-युवतींना मिळणारे हे प्रशिक्षण लाभदायक ठरणार आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल, असे मंत्री श्री. मलिक यांनी जाहीर केले आहे.
३ ते ५ महिन्याचे मोफत प्रशिक्षण…
या उपक्रमांतर्गत पुढील ३ वर्षात राज्यातील ३ लाख युवक-युवतींना बँकींग, फायनान्स सर्व्हिसेस, इन्शुरन्स, फायनान्शियल अकाउंटींग, व्यवसाय आणि उद्योगविषयक कायदे, टॅलीद्वारे कॉम्पुटराज्ड अकाउंटींग, इ-फायलिंग आदी विषयातील प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पदवीधारक, पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकणारे युवक, बारावीनंतर शिक्षण अर्धवट सोडलेले युवक यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ३५० तासांचे म्हणजे सुमारे ३ ते ५ महिने चालणारे हे प्रशिक्षण पुर्णत: मोफत असेल. राज्य शासनामार्फत यासाठीचा खर्च केला जाणार आहे. आयसीएआयद्वारे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये महाविद्यालये, प्रशिक्षण संस्था आदींची निश्चिती करुन प्रत्यक्ष आणि ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण दिले जाणार आहे.
राज्यातील विशेषत: वंचित घटकांपर्यंतही हे प्रशिक्षण पोहोचवून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. उद्योग आणि वाढत्या आर्थिक क्षेत्राची गरज पाहता हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल. मुलींना तसेच सामाजिकदृष्ट्या मागास घटकातील युवक-युवतींना हे प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात येणार आहे.