मुंबई : राज्यात १७ ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आलीय. येत्या १७ ऑगस्टपासून शाळा सुरू करण्यात येतील असा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. मात्र, कोविड टास्क फोर्स महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाशी सहमत नाही. अशा स्थितीत आता राज्य सरकार शाळा उघडण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करत आहे. राज्य मंत्रिमंडळात बुधवारी या विषयावर चर्चा झाली. त्यामुळे आता राज्य सरकारने या निर्णयाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे.
बुधवारी झालेल्या मंत्रिंडळाच्या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. या संवादामध्ये त्यांनी शाळा सुरु करण्याबाबत टास्क फोर्सच्या सूचनानंतर निर्णय घेण्यात येईल, असं म्हटलं होतं. “टास्क फोर्सने भीती व्यक्त केली आहे. कारण दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचं अद्याप लसीकरण झालेलं नाही. इतर राज्यात असे प्रसंग घडलेले आहेत. रिस्क घेऊ नये, असं त्यांना वाटतं. त्यामुळे याबाबतची बैठक घेऊन अंतिम निर्णय होईल”, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.
गेल्या वर्षभरापासून विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि आरोग्य सांभाळण्यासाठी निर्णय घेत आलो आहोत. टास्क फोर्सच्या बैठकीनंतर शाळा सुरु करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आलीय. टास्क फोर्स काय म्हणालं, या संदर्भातील माहिती घेणार असल्याची प्रतिक्रिया वर्षा गायकवाड यांनी दिली.