पुणे : योगगुरू व आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचे आज मंगळवारी निधन झालं. मागील आठवड्यात त्यांची प्रकृती खालावल्याने पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. वयाच्या 81 व्या वर्षी मंगळवारी त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मंगळवारी संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
योग आणि आयुर्वेद यांची सांगड घालत सामाजिक परिवर्तनासाठी गेली कित्येक वर्षं ते कार्यरत होते. विविध वृत्तपत्र, मासिकं आणि इतर माध्यमांतून या विषयातलं प्रबोधन करत असत. आतापर्यंत त्यांनी या विषयांवर शेकडो लेख लिहिले. आयुर्वैदाबाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचं मोठं कार्य त्यांनी गेली अनेक वर्षं केलं.
आयुर्वेद, अध्यात्म आणि संगीत यांची सांगड घालून आयुष्य अधिक आरोग्यपूर्ण बनवता येऊ शकतं, हा संदेश ते गेली 5 दशकं देत राहिले. शास्त्रोक्त आणि गुणवत्तापूर्ण आयुर्वैदिक औषधांच्या निर्मितीतही त्यांचं योगदान मोलाचं मानलं जातं. आयुर्वैदाचा त्यांनी भारतासह भारताबाहेरही प्रचार आणि प्रसार केला. आपल्या ओघवत्या वक्तृत्व शैलीचा उपयोग करून त्यांनी आयुर्वेदाची महती जगातील अनेक देशांमध्ये पोहोचवण्यात यश मिळवलं.