अहमदनगर : महापुराने पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथे हाहाकार माजला असून शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्त यांच्याकडून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी १० कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. साईबाबा संस्थानने त्यासाठी १० कोटींची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच डॉक्टरांची टीम आणि औषधे उपलब्ध करुन देणार आहेत, अशी माहिती ट्विटरच्या माध्यमातून संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी दिली आहे.
मुसळधार पावसामुळे राज्यामध्ये भीषण पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यातील जनजीवन या जलप्रलयाच्या थैमानामुळे विस्कळीत झाले आहे. हजारो नागरिक यामुळे बेघर झाले असून अनेक गावेही उध्वस्त झालेली आहेत.