जळगाव, (प्रतिनिधी) – भाजपला सोडचिठ्ठी देऊन ‘राष्ट्रवादी’ होणाऱ्या एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीत त्यांना योग्य ते स्थान दिले जाईल असे सांगण्यात येत असल्याने एकनाथ खडसे यांचं महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमध्ये स्थान निश्चित मानलं जात आहे.
उद्या एकनाथ खडसे मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करतील यानंतर त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. आधी मंत्रिपद नंतर विधानपरिषद सदस्यता असं होऊ शकत अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
खडसेंना मंत्रिमंडळात स्थान देतांना राष्ट्रवादीच्या एका मंत्र्याला त्यासाठी राजीनामा द्यावा लागणार आहे. राष्ट्रवादीत सध्यातरी जितेंद्र आव्हाड आणि दिलीप वळसे पाटील या दोन मंत्र्यांची नावं चर्चेत आहे. कृषीमंत्री एकनाथ खडसेंना बनवण्यात येईल, पण शिवसेना आणि राष्ट्रवादीत त्यासाठी खात्यांची अदलाबदल करावी लागेल. सध्या शिवसेनेचे दादा भुसे हे कृषीमंत्री असल्यामुळे हे पद एकनाथ खडसेंना देण्यासाठी त्याबदल्यात शिवसेनेला दुसरे खाते द्यावे लागणार आहे.
राजकीय चर्चानुसार शिवसेना कृषी खात्याच्या बदल्यात राष्ट्रवादीकडून गृहनिर्माण खाते घेऊ शकते. त्यामुळे गृहनिर्माण खात्याचे विद्यमान मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा राजीनामा घेतला जाऊ शकतो. जितेंद्र आव्हाड यांना पक्षात प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते अशी चर्चा आहे. तर दिलीप वळसे पाटील यांच्या तब्येतीच्या कारणामुळे फारसे सक्रीय नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड किंवा दिलीप वळसे पाटील या दोन मंत्र्यांपैकी एकाला आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो असे बोललं जात आहे.