नवी दिल्ली – सरकारी आणि संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची बचत वाढली असल्याने या क्षेत्रातील लोकांना मागणी वाढवण्यासाठी सरकार प्रोत्साहित करू पाहत असल्याने अर्थमंत्र्यांनी आज एलटीसी कॅश व्हाउचर स्कीमची घोषणा करताना सांगितले की, कॅश व्हाउचर स्कीमचा अंदाजित खर्च केंद्र सरकारसाठी ५,६७५ कोटी रुपये असून, सार्वजनिक उपक्रमांसाठी १,९०० कोटी असेल. एलटीसी कॅश व्हाउचर स्कीममुळे २८,००० कोटींची अतिरिक्त मागणी तयार होण्याचा अंदाज आहे. सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना दहा हजार रुपयांचा विना व्याज स्पेशल फेस्टिवल अॅडव्हान्स दिला जाईल. यासाठी रूपे कार्ड जारी केले जातील. यासाठीची मुदत 31 मार्च असणार आहे.
अर्थव्यवस्थेमधील मागणी वाढवण्यासाठी काही प्रस्तावांवर काम केले जात असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना सांगितले.
गरीब आणि दुर्बल घटकांसाठी आत्मनिर्भर पॅकेजमध्ये तरतूद करण्यात आली आहे. अर्थव्यवस्थेतील पुरवठा बाजूमध्ये सुधारणा झाली आहे. परंतु मागणी वाढवण्यासाठी आणखी प्रयत्न करण्याची गरज आहे, असं वित्तमंत्र्यांनी सांगितले. मागणीला चालना देण्यासाठी एलटीसी कॅश व्हाउचर स्कीम आणि स्पेशल फेस्टिवल अॅडव्हान्स स्कीम हे दोन प्रस्ताव आहेत.राज्यांना ५० वर्षे मुदतीचे १२,००० कोटी रुपयांचे कर्ज भांडवली खर्चासाठी दिले जाणार आहे.














