भडगाव, दिनांक २ (प्रतिनिधी ) : ”नारीशक्तीचा आवाज बुलंद करण्याचे काम आपण करत असून विकासाची मशाल प्रज्वलीत करण्यासाठी मला आपला भक्कम पाठींबा हवा !” असे भावनिक आवाहन शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांनी केले असता उपस्थित हजारो भगिनीवर्गाने त्यांना भरभरून दाद दिली. भडगाव येथील ‘न्यू होम मिनिस्टर’ कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पाचोर्यानंतर भडगावात देखील या कार्यक्रमाला अतिशय उत्स्फुर्त असा प्रतिसाद लाभला. हजारो महिलांनी या कार्यक्रमाची रंगत प्रत्यक्ष अनुभवली. तर शेकडो भगिनींनी यातील स्पर्धांमध्ये थेट सहभाग घेऊन आनंदाची लयलूट केली.
पाचोरा येथील ‘न्यू होम मिनिस्टर’ कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद लाभल्यानंतर आज भडगावातील शेतकी संघाच्या भव्य मैदानावरील कार्यक्रमाबाबत मोठी उत्सुकता लागली. स्थानिक भगिनीवर्ग मोठ्या उत्सुकतेने या कार्यक्रमाची वाट पाहत असतांना सायंकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास या कार्यक्रमाचा शानदार शुभारंभ झाला. आलेल्या सर्व भगिनींचे प्रवेश द्वारावर हळदी कंकू देऊन स्वागत करण्यात आले. प्रारंभी सह्याद्री मळेगावकर यांनी साई वंदना सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
यानंतर लय भारी न्यू होम मिनिस्टर लय भारी या गाण्याच्या तालावर क्रांतीनाना मळेगावकर यांचे स्वागत झाले. यासोबत वैशालीताई सुर्यवंशी यांची देखील जोरदार एंट्री झाली. याप्रसंगी कमलताई पाटील, वैशालीताई सुर्यवंशी, योजनाताई पाटील, क्रांतीनाना मळेगावकर यांच्याहस्ते महापुरूषांच्या प्रतिमांना माल्यार्पण करण्यात आले. याच मान्यवरांनी माल्यार्पण करून कार्यक्रमाचा शुभारंभ केला. सुरूवातीला वैशालीताई सुर्यवंशी यांच्याहस्ते क्रांतीनाना मळेगावकर व सह्याद्री मळेगावकर यांचा सत्कार करण्यात आला.
यानंतर कर्तबगार महिलांचा सत्कार करण्यात आला. यात ज्योती भीमराव पाटील, सुनीता सुरेश महाजन, सुनीता सुभाष भोसले, छाया नारायण पाटील, पंचशील भिकाजी निकम, शमीना पठाण, करीमा हाजी मुसा खान, वंदना पंडित पाटील, ज्योती संजय चौधरी, सुचीता बाबूराव पाटील व कल्पना भीकन ठाकरे यांचा समावेश होता. या सर्व मान्यवर महिलांचा वैशालीताई व क्रांतीनाना मळेगावकर यांच्याहस्ते अतिशय हृद्य असा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतीनाना आणि सह्याद्री यांनी गणराज व साई वंदना सादर केली. यानंतर पुन्हा एकदा ‘लयभारी ह्यो होम मिनिस्टर लय भारी’ या बहारदार गाण्याने रंगत भरली. यानंतर कार्यक्रमात पहिलेच जबरदस्त सादरीकरण झाले ते उखाण्यांचे ! मळेगावकर यांनी प्रेक्षकांमधून भगिनींना पाचारण करून त्यांच्याकडून उखाणे ऐकले तेव्हा अनेकदा हास्याचे फवारे उडाले. यानंतर सदाबहार अशा ‘तळ्यात-मळ्यात’ या कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये एकेक स्पर्धक बाद होत असतांना उपस्थितांनी याला जोरदार दाद दिली. यानंतर गाणे ओळखून नृत्य ओळखण्याचे सादरीकरण करण्यात आले.
याप्रसंगी सोडत काढून सुशीला मधुकर महाजन व मेघा संजय पवार यांना पैठणी भेट म्हणून देण्यात आली. यानंतर अयोध्या येथील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा गौरव करण्यासाठी खास ‘भारत का बच्चा बच्चा जय जय श्रीराम बोलेगा’ हे तुफान गाजत असलेले गीत सादर करण्यात आले असता सर्वांनी यावर ठेका धरला.
आजच्या कार्यक्रमात वैशालीताई सुर्यवंशी यांनी दोन्ही कार्यक्रमांना उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल पाचोरा आणि भडगाव येथील महिलावर्गाचे आभार मानले. ”स्त्री म्हणजे आदीशक्तीचे रूप असून सौभाग्याचे वाण देऊन विचारांची देवाण-घेवाण करण्यात येते. तसेच आपण आपले वडील स्व. आर.ओ. तात्यांचा वसा आणि वारसा घेऊन पुढे जात असून आपली साथ मला मिळावी” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तर, जनहितासाठी आपण सातत्याने कार्यरत असल्याचेही नमूद केले.
तात्यासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याचे ठरविले असून आपली भक्कम साध मला हवी असल्याचे देखील ताईंनी आवाहन केले. नारीचा आवाज बुलंद करण्यासाठी आपण कार्य करणार असल्याची ग्वाही वैशालीताई सुर्यवंशी यांनी याप्रसंगी दिली. याला उपस्थितांनी अतिशय भरभरून अशी दाद दिली.
यानंतर अतिशय बहारदार अशा फुगे फोडण्याचे सादरीकरण करण्यात आले. ‘ओ मनी माय बबल्या इकस केसावर फुगे !’ या सुपरहिट गाण्याने याचा प्रारंभ झाला. यावर उपस्थित स्पर्धकांनी बेधुंद नृत्य केले. यानंतर काडीच्या मदतीने दुसर्याचे फुगे फोडण्याचे ‘टास्क’ सुरू होताच जोरात चुरस निर्माण झाली. तर प्रेक्षकांनी याला हशा आणि टाळ्यांच्या गजरात जोरदार दाद दिली.
यात अंतीम फेरीपर्यंत टिकलेल्या सहा महिलांमध्ये जोरदार चुरस निर्माण झाली. यातील तिघी विजेत्या भगिनींगा पैठणी देऊन गौरविण्यात आले. तर या फेरीनंतर लागलेल्या झिंगाट या गाण्यावर उपस्थित महिलावर्गाने जोरदार ठेका धरला. खुद्द वैशालीताई सुर्यवंशी या आपली कन्या आणि मुलांसह यावर थिरकल्या तेव्हा उपस्थितांच्या उत्साहाला उधाण आल्याचे दिसून आले. यानंतर पाटलांचा बैलजोडा, तुम तो धोकेबाज हो, पाव्हणं जेवला काय ? मला आमदार झाल्यासारखं वाटतयं ! या गाण्यांवर महिलांनी धमाल नृत्य केले.
यानंतर सोडत काढून नावांची निवड करत त्यांना पैठण्या प्रदान करण्यात आल्या. तर वैशालीताई सुर्यवंशी यांची कन्या निधी नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी अतिशय सुमधुर स्वरात ‘विठू माऊली तू माऊली जगाची’ हे गाणे सादर केले असता त्यांना उत्स्फुर्त अशी दाद मिळाली. त्यांना क्रांतीनाना आणि सह्याद्री मळेगावकर यांनीही साथ दिली. तर सर्वात शेवटी तोंडाने फुगा फुगवून तो फोडण्याची धमाल स्पर्धा सुरू झाली. यात फायनलपर्यंत पोहचलेल्या सहा भगिनींना पैठण्यात भेट म्हणून देण्यात आल्या. तर पाचव्यापासून ते पहिल्या क्रमांकाच्या विजेत्यांना पारितोषीके प्रदान करण्यात आली. यातील पहिल्या क्रमांकाच्या विजेत्या महिलेच्या पतीला व्यासपीठावर बोलावण्यात आले. तर दुसर्या क्रमांकाच्या विजेत्या भगिनीचे पती हे काश्मीरात सैन्यदलामध्ये कार्यरत असून त्यांना व्हिडीओ कॉलवर या यशाबाबत माहिती देण्यात आली. यामुळे कार्यक्रमात अजून आगळीच रंगत भरली.