जळगाव,(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले असतांना जळगाव जिल्ह्यात देखील राजकारण तापले आहे.राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांत जागा वाटपाच्या चर्चा सुरू असल्या तरी जळगाव जिल्ह्यातील दोनही जागांवर निर्णय झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत रावेर लोकसभेची जागा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला तर जळगाव लोकसभेची जागा शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वाट्याला आल्याचं समजतं याबाबत उभाठा शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनीही ‘नजरकैद’ शी बोलतांना दुजोरा दिला आहे.
रावेर लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आ. एकनाथराव खडसे व पक्षाची रावेर लोकसभा मतदार संघात मोठी ताकद आहे. सद्या या लोकसभा मतदार संघाच्या खासदार खडसे यांच्या सुनबाई भाजपाच्या खासदार आहेत.प्रकृती चांगली असल्यास खडसे स्वतःच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकसभेचे उमेदवार असतील असं एकनाथराव खडसे यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. भाजपा कडून रक्षाताई खडसे यांना पुन्हा संधी दिल्यास सासरे आणि सुनबाई यांच्यात थेट लढत असण्याची शक्यता नाकारता येतं नाही.
दरम्यान रावेर व जळगाव लोकसभा मतदारसंघ भाजपासाठी बालेकिल्ला राहिले आहेत. मंत्री गिरीश महाजन यांनी दोनही जागा पाच लाख प्लस ने जिंकू असं जाहीर केलं आहे.भाजपाच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीला यश मिळावीण्यासाठी मोठी लढत द्यावी लागणार हे मात्र खरं. मविआची जागा वाटपावर चर्चा सुरू आहे. चार जागांबाबत एकमत होत नसल्याने त्यावर पुन्हा पुन्हा चर्चा केली जात आहे. त्यात जळगाव लोकसभेच्या जागेचाही समावेश होता. शुक्रवारी चर्चेत जळगाव लोकसभेची जागा शिवसेनेच्या ठाकरे गटाला तर रावेरची राष्ट्रवादीला सोडण्यावर एकमत झाल्याचे सांगण्यात आले आहे.