मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : शिबिरांच्या माध्यमातून कार्यकर्ता घडतो, पक्ष बांधणी मजबूत करायची असेल तर कार्यकर्ता निष्ठावान आणि प्रामाणिक असला पाहिजे, पक्षाची ध्येय धोरणे त्याला माहिती असली पाहिजेत, त्याने ग्राउंड लेव्हलला काम केले पाहिजे, गावा गावातील परिवाराशी त्याचे सौहार्दाचे नाते असले पाहिजे, सुखदुःखाच्या वेळी तो मतदारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असला पाहिजे. कार्यकर्ता घडण्यासाठी असे अभ्यास वर्ग अतिशय महत्त्वाचे असतात, यातून कार्यकर्ता घडतो, शिबिरात मिळालेली ही शिदोरी गावातील बुथरचना मजबूत करण्यासाठी वापरा,” वन बूथ थर्टी युथ ” याप्रमाणे बुथ रचना मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी परिश्रम घ्यावे, असे प्रतिपादन विधान परिषद सदस्य आमदार एकनाथराव खडसे यांनी मुक्ताईनगर येथे केले.
येथील गोदावरी मंगल कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवशीय निवासी शिबिराच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. भैय्यासाहेब रवींद्र पाटील, नंदुरबारचे माजी आमदार श्री पाडवी साहेब, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई,माजी आमदार अरुण दादा पाटील, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष ॲड. रोहिणी ताई खडसे, शिबिर प्रमुख यू.डी पाटील सर, प्रा. सुरेश पांडे सर, दीपक पाटील, आबा पाटील, किशोर पाटील, विलास धायडे, निवृत्ती पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आ. एकनाथराव खडसे यांनी कार्यकर्ता घडण्यासाठी शिबिर अर्थात अभ्यास वर्ग कसा महत्त्वाचा असतो हे स्पष्ट करून सांगितले. शिबिरात सहभागी सर्व शिबिरार्थींचे भाऊंनी अभिनंदन केले. याआधी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई यांनी देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांनी पेटून उठणे गरजेचे असल्याचे सांगितले. महागाई बेरोजगारी हे प्रश्न प्रामुख्याने जनतेसमोर मांडण्याची त्यांनी आव्हान केले. यावेळी माजी आ. श्री पाडवी यांनी शिबिरामध्ये राबवलेल्या विविध उपक्रमाविषयी आयोजकांच्या अभिनंदन केले.
समारोपीय भाषणामध्ये ह्या ॲड. भैय्यासाहेब रवींद्र पाटील यांनी पक्षाचे ध्येय धोरणांसह देशातील ज्वलंत प्रश्न जसे बेरोजगारी, महागाई जनतेसमोर पोहोचवा. देशात सुरू असलेली लोकशाहीची हत्या थांबवण्यासाठी पुढे या. सध्याचे सरकार हे मूठभर लोकांसाठी काम करीत असल्याची संत त्यांनी व्यक्त केली. शेतीमालाला भाव नाही, कापूस सोयाबीन, शेतकऱ्यांच्या घरात पडलेले आहेत, सरकारला शेतकऱ्यांकडे पाहायला वेळ नाही… अशा या दळभद्री सरकारला धडा शिकवण्याची हीच वेळ आहे, असल्याचे भैय्यासाहेब पाटील यांनी सांगितले.
याआधी ॲड. रोहिणी ताई खडसे यांनी दोन दिवसीय शिबिरासाठी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून बूथ प्रमुखांनी तसेच प्रमुख कार्यकर्त्यांनी जो प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. हे वर्ष हे निवडणुकांचे वर्ष असून आतापासूनच कामाला लागा, पक्ष संघटन मजबूत करा येणाऱ्या निवडणुकांमध्ये विजय राष्ट्रवादीचाच असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच शिबिर यशस्वीतेसाठी प्रा. सुनील नेवे सर यांनी उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन केले. शिबिरात प्रा. सुरेश पांडे, प्रा. जतीन मेढे यांची प्रभावी व्याख्याने कार्यकर्त्यांना भुरळ पाडून गेली. तसेच आज निमखेड येथील युवराज सुभाष पाटील यांच्या मनोगताला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. रात्री टिकटिक वन मिनिट, मामाचं पत्र हरवलं, शेलापागोटे या कार्यक्रमातून कार्यकर्त्यांनी मनमुराद आनंद लुटला.