जळगाव,(प्रतिनिधी)- अंगणवाडी कर्मचारी व सेविकांच्या विविध मागण्यांसाठी गेल्य २३ दिवसांपासून संप पुकारण्यात आला आहे. राज्य शासनाकडून मागण्या पुर्ण होत नसल्याने मंगळवारी जिल्हा अंगणवाडीसेविका, कर्मचारी संघटनाकडून जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राज्य शासनासह ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
सकाळी ११ वाजता शहरातील शामा प्रसाद मुखर्जी उद्यानापासून मोर्चाला सुरुवात झाली. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे अमृत महाजन, अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या जिल्हाध्यक्षा प्रेमलता पाटील, अंगणवाडी कर्मचारी संघाचे संघटक भानुदास पाटील, जिल्हाध्यक्षा सुषमा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढला. यावेळी कृती समितीच्यावतीने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांना देण्यात आले.
विधानसभा अधिवेशनात महिला बालकल्याण मंत्री यांनी चर्चेला उत्तर दिले नाही. तसेच ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी हक्क भंग करून चुकीचे उत्तर दिले असा आरोप करत, अंगणवाडीसेविकांकडून ग्रामविकास मंत्र्याविरोधात घोषणाबाजी केली.