जळगाव,(प्रतिनिधी)- जालना जिल्ह्यात शांततेने उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठी चालवीणाऱ्या सत्ताधाऱ्यांना जनता सत्तेवर ठेवणार नाही, संधी मिळेल तेव्हा त्यांचा पराभव करतील, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी जळगाव येथीलजाहीर ‘स्वाभिमान सभेत’ बोलताना व्यक्त केले.शहरातील सागरपार्क मैदानावर शरद पवार यांची स्वाभिमान सभा आयोजित करण्यात आली होती.सभेला प्रचंड गर्दी उसळली होती.
यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, एकनाथराव खडसे, गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, डॉ. सतीश पाटील, ॲड. रोहिणी खडसे, संतोष चौधरी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, की देशातील आणि राज्यातील सरकारला शेतकऱ्यांविषयी कोणतीही आस्था नाही. कांदा, कापूस भावाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यात तब्बल वीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, शेतकरी हा भीक मागत नाही तर आपल्या घामाची किंमत मागतो आहे.मात्र हे सरकार तेव्हढेही त्यांना देऊ शकत नाही. त्यामुळे देशातील आणि राज्यातील सत्ता चुकीच्या लोकांच्या हातात दिली आहे, अशी भावना लोकांच्या मनात निर्माण झाली आहे.
देशातील सरकारकडून सत्तेचा गैरवापर होत असल्याचा आरोप करून शरद पवार म्हणाले, की सत्तेचा उपयोग जनतेसाठी करायाचा असतो, परंतु सध्याचे सरकार सत्तेचा वापर ईडी व सीबीआयच्या कारवाया विरोधकांवर करण्यासाठी वापरत आहेत. नवाब मलीक, अनिल देशमुख यांच्यावर ईडीची कारवाई करण्यात आली. सद्यःस्थितीत सत्तेचा संपूर्ण गैरवापर सुरू आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना शरद पवार म्हणाले, की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भोपाळ येथे गेले होते. त्या वेळी जाहीर सभेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. खरंच चुकीचे काम केले असेल तर त्याची सखोल चौकशी करा; परंतु जर खोटं निघाल तर पंतप्रधान काय शिक्षा घेणार, हेही त्यांनी सांगावा. पंतप्रधानांनी खोटे आरोप करावे ही जनतेच्या हिताचे नाही, असेही मत शरद पवार यांनी व्यक्त केले.