जळगाव,(प्रतिनिधी)- जळगाव जिल्ह्यात दोन लोकसभा जागा असून दोघही ठिकाणी भाजपचे खासदार असून जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघ भाजपचे ‘बालेकिल्ला‘ आहे.भाजपाच्या दोनही जागा निवडून आणण्यात एकनाथ खडसेंचा मोठा प्रभाव राहिला आहे आता त्याच खडसेनां लोकसभेच्या रिंगणात उतरवणार असल्याचे संकेत कालच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘स्वाभिमान सभेत’ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले आहे लोकसभेच शिवधनुष्य उचलायला हवं असे आवाहन खडसे यांना केलं असून एकनाथ खडसे आगामी २०२४ चे रावेर लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीकडून निवडणूक लढतील अशीच चर्चा रंगत आहे.
जळगाव जिल्ह्यात रावेर आणि जळगाव असे दोन लोकसभेचे मतदारसंघ आहेत. त्यापैकी खडसे यांच्या सून रक्षा खडसे रावेरमधून भाजपच्या विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे खडसे जर रावेरमधून लढले तर रक्षा खडसेही राष्ट्रवादीत येणार का अशा चर्चा होऊ लागल्या आहेत. गेली अनेक निवडणुका रावेर आणि जळगाव या दोन्ही लोकसभांवर भाजपचं वर्चस्व आहे. मात्र इथल्या अनेक भागांमध्ये एकनाथ खडसेंचाही प्रभाव चांगला आहे, त्यामुळे खडसेंना लोकसभेचा प्रस्ताव देऊन राष्ट्रवादीनं भाजपाला आव्हान देण्याची तयारी सुरु केलीय.
रावेर लोकसभेची जागा काँग्रेसची….
राज्यात महाविकास आघाडी एकत्र असून काँगेस, राष्ट्रवादी, शिवसेना(ठाकरे गट) यांनी विधानसभा, लोकसभा निवडणुका एकत्र लढल्यास जागा वाटपाचा मोठा पेच निर्माण होऊ शकतो. रावेर लोकसभा मतदार संघाच्या जागेवर काँग्रेस दावा आहेच, यावेळी माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील या निवडणूक मैदानात उतरल्याची चर्चा असून त्या दिशेने त्यांचं कामही सुरु आहे. डॉ. उल्हास पाटील यांचा या लोकसभा मतदार संघात मोठा संपर्क देखील आहे,असं असून देखील महाविकास आघाडीच्या जागा वाटपात रावेर लोकसभेची जागा राष्ट्रवादीला गेल्यास आणि एकनाथ खडसेनां उमेदवारी जाहीर झाल्यास भाजपासमोर आव्हान थाटणार आहे.त्यामुळे यंदा एकनाथ खडसे लोकसभेसाठी उभे राहणार का असा प्रश्न आहे.
महाविकास आघाडीच्या जागा वाटपात रावेर लोकसभा मतदार संघ काँग्रेसकडे ठेवण्यात काँग्रेसला यश मिळाल्यास डॉ. उल्हास पाटील यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील या लोकसभेच्या उमेदवार असू शकतात अशा वेळी महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आण्यासाठी एकनाथ खडेसेंवर जबाबदारी टाकली जाऊ शकते.