भडगाव । बेपत्ता ९ वर्षीय बालिकेचा मृतदेह कुट्टीच्या ढिगाऱ्याखाली आढळून आल्याची खळबळजनक घटना भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे उघडकीस आलीय. कल्याणी संजय पाटील असे मृत मुलीचे नाव असून तीन दिवसापूर्वी बालिका बेपत्ता झाल्याची तक्रार भडगाव पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली होती.
गोंडगाव येथे कुटुंबियांसोबत वास्तव्यास असलेली कल्याणी बेपत्ता होती. याबाबत ३० जुलैला भडगाव पोलीस स्टेशनला बेपता झाल्याची तक्रार केली होती.
बालिका बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस खात्यातर्फे या बालिकेचा शोध घेण्याचे काम सुरु होते. या बालिकेचा तपास सुरू असतानाच १ रोजी गावातील एका गोठ्यातील कडबा कुट्टीच्या ढिगाऱ्यात ही बालिका मृत अवस्थेत आढळून आली.
या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक अधीक्षक रमेश चोपडे, पोलीस उपविभागीय अधिकारी अभयसिंग देशमुख, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर, कजगाव पोलीस मदत केंद्राचे छबुलाल नागरे, नरेंद्र विसपुते यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि निलेश राजपुत, सहा. फौ. अनिल जाधव, पो.हे.कॉ. लक्ष्मण पाटील, प्रितम पाटील यांच्यासह भडगाव पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी सुरू केली.

