शहादा । नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आलीय. येथे जमिनीच्या वादावरून गावठी कट्ट्याने गोळीबार करून पिता पुत्राला ठार केल्याची घटना घडली. अविनाश सुखराम खर्डे (वय26) सुक्राम कलजी खर्डे (वय 45) अशी मृतांची नावे असून या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत पाच संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. .
शहादा तालुक्यात मलगाव येथून अडीच किलोमीटर अंतरावर पिपली पाडा असून या ठिकाणी सुक्राम खर्डे हे शासकीय जमीन कसत होते. या जमिनी बाबत नातेवाईकांमध्ये वाद सुरू असल्याने तो न्यायप्रविष्ठ होता. गुरुवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास सुखराम खर्डे हे आपल्या कुटुंबासह शेतात निंदणी करत असताना यावेळी सुनील राजेंद्र पावरा, अरुण राजेंद्र पावरा, ललिता राजेंद्र पावरा, राहणार बिड्या तालुका पानसेमल मध्य प्रदेश गणेश दिवाणखरडे सोनीबाई गणेश खरडे, रमीबाई दिवाण खरडे, राहणार मालगाव तालुका शहादा हे सर्वजण शेतात येऊन त्यांनी तुम्ही शेतात निंदणी करू नका ही जमीन आमची असल्याचे सांगितले.
या कारणावरून दोन्ही कुटुंबात वाद निर्माण होऊन त्याचे पर्यावरण हाणामारीत झाले. या हाणामारीत विळा तलवारी लाकडी दांडगे आधी हत्यारांचा वापर करण्यात आला. संतापात सुनील पावरा याने त्याच्याकडे असलेल्या गावठी कट्ट्यातून दोन राऊंड फायर केले. यात अविनाश हा जागीच ठार झाला, तर सुखराम हे गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना ते मृत पावले.
या घटनेमुळे नंदुरबार जिल्हा हादरला असून घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पवार, पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी भेट दिली दरम्यान गावात तणावपूर्ण शांतता असून चौक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

