जळगाव । सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या. जिल्हा कार्यालय, जळगाव यांच्यामार्फत (चांभार, मोची, ढोर व होलार) इ. व्यक्तींचे जीवनमान उंचावणे, समाजप्रवाहात मानाचे स्थान मिळविण्याच्या उद्देशाने त्याचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध शासकिय योजना महामंडळाच्या जिल्हा कार्यालयामार्फत आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये राबविल्या जात आहेत.
केंद्र शासनाच्या एन.एस.एफ.डी.सी. यांच्यामार्फत खालील योजना महामंडळामार्फत २०२३-२४ या आर्थिक वर्षात राबविण्यात येत आहे.
मुदती कर्ज योजना उद्दिष्टे-२०, लघुऋण वित योजना उद्दिष्टे-२९, महिला समृध्दी योजना उद्दिष्टे -२२, शैक्षणिक कर्ज योजना उद्दिष्टे -२० देण्यात आले आहे.
योजनांकरीता आवश्यक कागदपत्रे- लाभर्थ्याचे उद्योग आधार प्रमाणपत्र, शॉप अॅक्ट लायसन्स किंवा ग्रामपंचायत ना हरकत दाखला, लाभार्थ्याचा विनंती अर्ज, कागदपत्रे खरी असल्याबाबत व ज्या जागी व्यवसाय चालू त्याच जागेचे प्रमाणित केलेले छायाचित्र, जातीचा दाखला, रेशन कार्ड शाळा सोडल्याचा दाखला वयाच्या पुराव्याकरीता) चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला (मा. तहसीलदार यांनी दिलेला) रहिवाशी दाखला, दोन सक्षम जामीनदारांपैकी नोकरदार असेल तर त्यांच्या कार्यालयाचे लाभार्थ्याने वसूलीचा भरणा केला नाहीतर जामीनदाराच्या पगारातून कपात करून भरणा करण्यात येईल असे कार्यालयाचे हमीपत्र (विहित नमुन्यात शपथपत्र) जर लाभार्थ्यांचा जामीनदार शेतकरी असेल तर ७/१२ उतारा आधारकार्ड व विहित नमुन्यत शपथपत्र, लाभर्थ्याचा सिबील क्रेडीट स्कोअर रिपोर्ट, अर्जदाराचे वारसदारांच्या स्वाक्षरीसह नामांकन शपथपत्र, लाभार्थ्याचा आधार कार्ड क्रमांक तसेच आधार संलग्न (Link) बँक खाते क्रमांक व पॅनकार्ड, जी.एस.टी. क्रमांकासह व्यवसायाचे दरपत्रक, प्रकल्प अहवाल (Project Report) अर्जदाराचे विहित नमुन्यातील शपथपत्र इत्यादी कागदपत्रे कर्ज मागणी अर्जासोबत दाखल करणे आवश्यक आहे.
जळगाव जिल्ह्यातील अर्जदारांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा व आपली सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक प्रगती योजनांमार्फत साध्य करुन आपला सामाजिक स्तर उंचवावा. असे आवाहन एस.एन तडवी, जिल्हा व्यवस्थापक, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या. यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

