जामनेर : जामनेरमधून एक मनाला चटका लावणारी घटना समोर आली आहे. आपल्या तान्हुन्याला झोक्यात झोपूवन आई कामावर निघून गेली, तो झोक्यातून पडू नये म्हणून त्याला रुमाल बांधला, मात्र बांधलेला हाच रुमालच चिमुकल्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरला.
उठल्यानंतर झोक्यातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात बांधलेल्या रुमालाचा गळफास लागून चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. निर्भय वसंत इंगळे(वय १ वर्ष) असं मृत चिमुकल्याचं नाव आहे. ही घटना जामनेर शहरातील गिरीजा कॉलनीत घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
जामनेर शहरातील गिरीजा कॉलनीत वसंत इंगळे हे पत्नी व कुटुंबासह वास्तव्यास आहेत. वसंत इंगळे हे खाजगी वाहनावर चालक म्हणून काम करतात. तर त्यांची पत्नी रुग्णालयात कामाला आहे. गुरुवारी वसंत इंगळे हे सकाळी नेहमीप्रमाणे कामाला निघून गेले. त्यानंतर त्यांच्या पत्नीने कामावर जाण्यापूर्वी मुलगा निर्भयला दूध पाजले. मग त्याला झोक्यात झोपविले. निर्भय झोक्यातून पडू नये म्हणून मध्यभागी झोक्याला रुमाल बांधला. त्यानंतर घरात असलेल्या धाकट्या बहिणीला निर्भयवर लक्ष ठेवण्यात सांगून निर्भयची आई रुग्णालयात कामावर निघून गेली.
हे पण वाचा..
मोबाइलवर क्राइम वेबसीरीज पाहणाऱ्यांनो सावधान! संशोधनातून धक्कादायक माहिती समोर
हृदय पिळवटून टाकणारी घटना! पीठ मळणी यंत्रात अडकून चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
बसच्या सीटवर बसून तरुणाचं घाणेरड कृत्य, तरुणीने व्हिडिओ काढत केली पोलखोल
भाजप-शिंदे गटातील युतीत फूट? शिंदे गटाचे खासदार म्हणाले, हे अजिबात मान्य नाही..
मात्र अचानक जागं झालेल्या बाळाने खाली उतरण्याचा प्रयत्न करताच त्याच्या संरक्षणासाठी बांधलेला रुमालच त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरला.निर्भयला पाहण्यासाठी मावशी आली असता निर्भय हा झोक्याबाहेर लटकलेला दिसून आला. ते पाहून निर्भयच्या मावशील धक्काच बसला. तिने त्याला बाहेर काढले, मात्र तो हालचाल करीत नसल्याने लक्षात आल्याने तिने निर्भयच्या आई व वडिलांना तात्काळ बोलावून घेतले.
आई, वडिलांनी तातडीने निर्भयला जवळच्या खाजगी रुग्णालयात नेले, मात्र तोपर्यंत निर्भयने प्राण सोडले होते. त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगताच निर्भयच्या आई वडीलांसह कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला. दरम्यान दहा दिवसांपूर्वी आनंदी वातावरणात निर्भय याचा पहिलाच वाढदिवस साजरा झाला होता. मात्र तान्हुल्या निर्भयला नियतीने अचानक हिरावून नेल्याने वसंत इंगळे यांच्या कुटुंबावर मोठे दुःख कोसळले आहे.