मुंबई : टीव्हीवरच्या काही क्राइम सीरीज वगळता आणि फिल्म वगळता क्राइम सीरीजचा फारसा बोलबाला नव्हता. पण आता प्रत्येकाच्या हातात अँड्रॉइड फोन आल्यानंतर वेगवेगळ्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून क्राइम वेबसीरीजने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. तुम्हीही सतत मोबाइलवर क्राइम वेबसीरीज पाहत असाल तर सावधान..
क्राइम वेब सीरीज पाहून त्याचा आधार घेत गुन्ह्यांचं प्रमाण वाढल्याचं आता समोर आलं आहे. गुन्हेगॅरी ५ वर्षांत ३ टक्क्यांनी वाढल्याचं एका रिसर्चमधून समोर आलं आहे. ३-४ वर्षांपूर्वी क्राइम मालिकांचे एवढे पेव फुटलेले नव्हते. त्या काळात दाखल होणाऱ्या १०० गुन्ह्यांतील एखादा गुन्हेगार मालिका पाहून गुन्हा केल्याची कबुली देत होता. सध्या ते प्रमाण ४ टक्क्यांवर गेल्याची माहिती समोर आली आहे.
सध्या शाळेतल्या मुलापासून ते वयोवृद्धापर्यंत क्राइम मालिका पाहणाऱ्यांची संख्या वाढली आहे. या मालिका मनोरंजनाचा भाग आहेत, परंतु, काही जणांना त्या गुन्हेगारीची वाट दाखवत आहेत. त्याची काही उदाहरणे समोर आली.
क्राइम मालिकांमुळे लहान मुलांपासून मुली-महिला, युवकांच्या मनावर दुष्परिणाम होत असल्याचं दिसून येतंय. आपल्याला होत असलेला त्रास, इच्छा असलेले सध्या करण्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी यासाठी क्राइम सीरीजमध्ये पाहिलेल्या काही घटनांचा आधार घेऊन काही जण गुन्ह्याचे प्लॅनिंग करतात.
त्यामुळे चित्रपट, शॉर्ट फिल्म, सिरीयल या समाजामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी आणि चांगलं काहीतरी घडवण्यासाठीच साधन आहे. तरी आता ते क्राइम सीरियलच्या माध्यमातून समाज बिघडण्याचं काम होत आहे, हे मात्र नक्की. त्यापासून आपली लहान मुलं आणि आपलं कुटुंब कसं दूर राहील, याचा विचार सगळ्यांनीच केला पाहिजे.