जळगाव : जामनेर तालुक्यातील नेरी या गावात एका २५ वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आपल्या व्हॉट्सअॅपवर स्टेटसवर स्वत:लाच भावपूर्ण श्रद्धांजली देत आपलं आयुष्य संपवलं. ऋषिकेश दिलीप खोडपे उर्फ गोलू (वय २५) असं या मयत तरुणाचं नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकलेलं नाही.
नेरी बु. (ता.जामनेर) येथे ऋषीकेश हा कुटुंबियांसह वास्तव्यास होता. शनिवारी रात्रीच्या सुमारास ऋषीकेशने व्हॉट्सअॅप स्टेटसवर मूड ऑफ असे स्टेटस ठेवले. शनिवारी रात्री गावातील सप्ताहाच्या धार्मिक कार्यक्रमात ऋषिकेश याने सहभाग घेतला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी व्हॉट्सअॅप स्टेटसवर भावपूर्ण श्रद्धांजली असे स्टेटस ठेवले. त्यानंतर त्याने चुलत भाऊ प्रदीप खोडपे यास फोन करत मी तुला सोडून जात आहे.. असे सांगितले.
भाऊ पोहचला तोपर्यंत..
ऋषिकेश याने सांगितल्यानुसार प्रदीप हा त्या ठिकाणी पोहचला. यावेळी ऋषिकेश हा शेतातील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. घटनेची माहिती मिळाल्यावर गावकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली. पोलिसांनी ऋषिकेश यास खाली उतरवून जामनेर उपजिल्हा रुग्णालयात नेले.

