मुंबई : नाशिक- नांदूरनाका येथे झालेल्या खाजगी बसच्या भीषण दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मृत आणि त्यांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना प्रकट करून या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.
अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने वैद्यकीय उपचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. अपघाताच्या कारणांचा सर्वंकष चौकशीतून शोध घेतला जाईल. त्याबाबत सर्व यंत्रणांना निर्देश देण्यात आले आहेत. घटनास्थळावरील मदतीसाठी तसेच रूग्णालयातील उपचारासाठी सर्व यंत्रणा तातडीने कार्यान्वित व्हाव्यात यासाठी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत.