मुंबई : राज्यात अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) एकापाठोपाठ एक छापे टाकले जात आहेत. अशातच आता तपास यंत्रणेचे पथक शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या भांडुप, मुंबईतील घरी पोहोचले आहे. त्याला चौकशीसाठी ईडी कार्यालयात नेले जाऊ शकते. 1034 कोटी रुपयांच्या पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी राऊत यांची चौकशी सुरू आहे. यामुळे राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे
ईडीचे पथक आल्यानंतर संजय राऊत यांच्या घराबाहेर त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी झाली आहे. राऊत यांचे समर्थक तपास यंत्रणा आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधात घोषणा देत आहेत. 1 जुलै रोजी चौकशी केल्यानंतर त्यांना 20 आणि 27 जुलै रोजी समन्स बजावण्यात आले होते, परंतु संसदेचे अधिवेशन असल्याने ते 7 ऑगस्टनंतरच हजर राहू शकतात, अशी माहिती त्यांच्या वकिलांमार्फत पाठवण्यात आली. या प्रकरणी ईडीने राऊत यांची दादर आणि अलिबागमधील मालमत्ता जप्त केली आहे.
यापूर्वी, ईडीच्या समन्सच्या मुद्द्यावर उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सुरू असलेल्या प्रचाराचा हवाला देत राऊत यांनी हजर राहण्यासाठी आणखी वेळ मागितला होता.
पत्रा चाळ घोटाळा प्रकरण?
ईडीच्या म्हणण्यानुसार, गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळच्या पुनर्विकासाचे काम देण्यात आले होते. हे काम म्हाडाने त्यांच्याकडे सोपवले होते. याअंतर्गत मुंबईतील गोरेगाव येथील पत्रा चाळमध्ये ४७ एकर जागेवर ६७२ भाडेकरूंच्या घरांचा पुनर्विकास करण्यात येणार होता.
हे पण वाचा :
1 ऑगस्टपासून होणार ‘हे’ 5 मोठे बदल, सर्वसामान्यांवर होणार थेट परिणाम
शिंदे सरकारचा खडसेंना धक्का! भोसरी भूखंड प्रकरणाचा तपास एसीबीकडे
8 वी ते 10 वी पाससाठी सरकारी नोकरी उत्तम संधी.. लगेचच अर्ज करा
ईडीच्या म्हणण्यानुसार, गुरु आशिष कन्स्ट्रक्शनने म्हाडाची दिशाभूल केली आणि फ्लॅट न बांधता ही जमीन 9 बिल्डरांना 901.79 कोटी रुपयांना विकली. नंतर गुरु आशिष कन्स्ट्रक्शनने Meadows नावाचा प्रकल्प सुरू केला आणि घर खरेदीदारांकडून फ्लॅटसाठी 138 कोटी रुपये जमा केले.
बांधकाम कंपनीने 1,034.79 कोटी रुपयांहून अधिक बेकायदेशीरपणे कमावल्याचे तपासात उघड झाले आहे. नंतर त्याने ही रक्कम बेकायदेशीरपणे त्याच्या साथीदारांकडे वर्ग केली.
ईडीच्या म्हणण्यानुसार, गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड ही हाउसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एचडीआयएल) ची भगिनी कंपनी आहे. एचडीआयएलने प्रवीण राऊत यांच्या खात्यात सुमारे 100 कोटी रुपये जमा केल्याचे तपासात समोर आले आहे.
2010 मध्ये प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरीने 83 लाख रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात ट्रान्सफर केले. या रकमेतून वर्षा राऊत यांनी दादरमध्ये फ्लॅट खरेदी केला. ईडीने तपास सुरू केल्यानंतर वर्षा राऊतने माधुरी राऊतच्या खात्यावर ५५ लाख रुपये पाठवले होते.