पुणे : लग्नाला अवघे काही दिवस शिल्लक असतानाच लग्नाची खरेदी करून भावाबरोबर दुचाकीवरून गावी परतत असताना झालेल्या अपघातात नवरी तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर, अपघातात तिचा भाऊ गंभीर जखमी झाला आहे. ही घटना पुणे-सोलापूर महामार्गावर झाला. प्रतीक्षा सादशिव कांबळे (वय २१) असं मृत मुलीचं नाव आहे. या घटनेने कुटुंबियांना धक्का बसला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रतिक्षा हीचे पुढच्या महिन्यात लग्न ठरले होते. लग्नाच्या खरेदीसाठी ती तिचा भाऊ शुभम याच्यासह मोटारसायकलवर गुरुवारी सकाळीच ते पुणे शहरात गेले होते. दिवसभर खरेदी केल्यानंतर सायंकाळी मलठणला (ता. दौंड) घरी परतत असातना वाटेत कौठीचा मळा जवळ एका डंपरने ठोकरले. त्यामध्ये प्रतिक्षाच्या डोक्याला जबर मार लागला व तीचा जागीच मृत्यू झाला. तर शुभम हा गंभीर जखमी झाला. मात्र अपघात झाल्याचे लक्षात येताच ट्रकचालक मात्र ट्रकसह पळून गेला. आपघाच्या आवाजाने परिसरातील लोक गोळा झाले त्यांनी पोलिसांनी बोलावले. जवळच असलेल्या टोलनाक्यावरील रुग्णवाहितीकेतून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी प्रतिक्षाला मृत घोषित केले आणि शुभम याच्यावर उपचार सुरु आहेत.
दरम्यान अपघातस्थळी त्यानी लग्नासाठी खरेदी केलेले कपडे व साहित्य रस्त्यावर अस्ताव्यस्त पडले होते. त्यामध्ये शुभमच्या ओळखपत्र आणि त्याच्या मोबाईलमुळे त्याच्या घराच्यांना पोलिसांनी फोन करून घटनेची माहिती दिली. मुलगी ठार झाल्याची बातमी कळताच कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. घटना गावामध्ये कळताच अवघ्या गावावर शोककळा पसरली. पोलिसांनी पंचासमक्ष पंचनामा करून अपघाती मृत्यूची नोंद केली.