सावदा : सावदा- आमोदा रस्त्यावर कारची समोरासमोर धडक होवून भीषण अपघात झाला. या अपघातात मुलाच्या लग्नाच्या रिसेप्शन सोहळ्याच्या खरेदीसाठी जात असलेल्या नवरदेवाच्या आईचा अपघाती मृत्यू झाल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. भावना भरत सुपे (वय 40) असे मयत महिलेचे नाव असून या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत असे की, माजी पंचायत समिती उपसभापती भरत सुपे यांचे मोठे सुपुत्र पियूष यांचा लग्नानिमित्त सावदा येथील विश्रामगृहसमोर रविवारी (ता.५) रिसेप्शन सोहळा होता. शामियाना उभारून त्याची जय्यत तयारी सुरू होती. परिवारात शुभ कार्यक्रम असल्याने सर्वजण आनंदीत होते.
खरेदीनिमित्ताने नवरदेवाची आई भावना सुपे यांच्यासह मुलगा क्रिष्णा सुपे, मोठी आई विद्या सुपे असे कार (क्र. डीएल १०, सीई ६१६५) जळगाव येथे जात होते. या दरम्या पिंपरूड रस्त्यावर चालक क्रिष्णा सुपे याचा गाडीला ओव्हरटेक करताना वाहनावरील ताबा सुटला. यात त्याचे वाहन समोरून येणारी कारला (क्र. एमएच, १९, एपी २६१२) घासून पलटी झाली. यात भावना सुपे यांचा जागीच मृत्यू झाला. तर विद्या काशिनाथ सुपे, क्रीष्णा सुपे यांच्यासह दोन्ही वाहनातील ५ ते ६ जण जखमी झाले.