नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणि राज्यांनी कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरिअंटला रोखण्याचे जिकिरीचे प्रयत्न करूनही ओमिक्रॉनचा अखेर भारतात शिरकाव झाला आहे. कर्नाटकमध्ये साऊथ आफ्रिकेतून आलेले दोन रुग्ण कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटने बाधित झाले आहेत. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. खुद्द भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने याला दुजोरा दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका संक्रमित रुग्णाला लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत तर दुसऱ्या रुग्णाने पहिला डोस घेतला आहे. ओमिक्रॉनची लागण झालेल्या ६६ वर्षीय व्यक्तीने दक्षिण आफ्रिकेला भेट दिली होती. तर 46 वर्षांच्या इतर रुग्णाने असा कोणताही प्रवास केला नव्हता आणि तो एक आरोग्य कर्मचारी आहे. दोन्ही रुग्णांना फक्त तापाची तक्रार असून ते पूर्णपणे बरे आहेत.
आरोग्य मंत्रालयाने वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) च्या हवाल्याने म्हटले आहे की कोरोनाचे ओमिक्रॉन प्रकार डेल्टा पेक्षा 5 पट जास्त धोकादायक आहे आणि इतरांपेक्षा वेगाने पसरू शकते.
आतापर्यंत 29 देशांमध्ये ओमिक्रॉन वेरिएंटची लागण झालेल्या रुग्णांची ओळख पटली आहे आणि WHO ने त्यांना व्हेरिएंट ऑफ कन्सर्नच्या श्रेणीमध्ये ठेवले आहे. दक्षिण आफ्रिकेत या प्रकाराचा संसर्ग झालेल्या रुग्णाची प्रथम ओळख झाली.