पाचोरा प्रतिनिधी । काल पाचोरा शहरासह परिसरात जोरदार पाऊस झाला. यामुळे हिवरा नदीला पूर आला आहे. या नदीला आलेल्या पुराच्या पाण्याच्या प्रवाहात येथील ४० वर्षीय तरूण जात असतांना पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेल्याची घटना आज सकाळी घडली. देवेंद्र धनराज शिंपी (वय – ४०) असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव असून त्याचा तालुका प्रशासनाकडून शोध घेतला जात आहे.
दि. २१ रोजी रात्री वरील भागात जास्त पाऊस झाल्याने नदीला पूर आला आहे. त्यामुळे नदी पार करून जाणे अडचणीचे असतांना देवेंद्र शिंपी हे रात्री शहरातच नातेवाईकांकडे मुक्कामी थांबले होते. मात्र सकाळी घरी परत येत असतांना ही घटना घडली असल्याचे प्रथमदर्शनींनी सांगितले.
देवेंद्र शिंपी सकाळी सुमारे ६ :३० च्या सुमारास गावातून घराकडे शिव कॉलनी, कृष्णापुरी कडे येत असतांना पुलावरील पाणी अचानक पाणी वाढल्याने त्याला पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे देवेंद्र शिंपी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. दरम्यान इसमाचा मृतदेह शोध कार्य सुरू असून घटनास्थळी तहसिलदार कैलास चावडे, न. पा. मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी पाहणी करून कर्मचाऱ्यांना पुढील सुचना दिल्या असुन परिसरातील जनतेने खबरदारी घेण्याचे आवाहन ही यावेळी करण्यात आले आहे.