संगमनेर : आर्थिक हालाखीला कंटाळून आत्महत्या करण्याचे सत्र सुरूच आहे. अहमदनगरमधील संगमनेर बस डेपोमध्ये एका एसटी बस चालकानं बसमध्येच गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुभाष शिवलिंग तेलोरे (रा. कोल्हार कोलूबाईचे ता. पाथर्डी, जि. नगर) असं मृतक बस चालकाचे नाव आहे.
दरम्यान, कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे तेथे आढळून आलेल्या चिठ्ठीवरून दिसून येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, त्यामध्ये कोणाचेही नाव अगर कोणाविरुद्ध तक्रार नसल्याचेही सांगण्यात आले.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एसटी बसचे चालक सुभाष तेलोरे यांनी अहमदनगरमधली संगमनेर बस डेपो येथे एसटी बसमध्येच गळफास घेत आयुष्य संपवलं. संगमनेर स्थानकात पाथर्डी-नशिक (एम. एच. १४, बी. टी. ४८८७) ही बस उभी होती. त्यामध्ये तेलोरे यांचा गळफास लावून घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. त्यांनी रात्रीच्या सुमारास गळफास घेतला. पाथर्डी – नाशिक या बसचे ते चालक होते. संगमनेर बसस्थानकात डिझेल नसल्यानं नाशिकला न जाता संगमनेरला बस मुक्कामी होती. त्यावेळी रात्रीच्या सुमारास त्यांनी कपड्याच्या सहाय्याने बसमध्ये गळफास घेतला.
पहाटे पाचच्या सुमारास तेलोरे आपल्या अन्य सहकाऱ्यांसह कामावर जाण्यासाठी तयार झाले. डेपोतून बाहेर पडताना ते पुढे निघाले. मी पुढे जातो, तुम्ही पाठीमागून या, असे त्यांनी सहकाऱ्यांना सांगितले. थोड्यावेळाने वाहक जावळे बसमध्ये आले. त्यावेळी चालक तेलोरे यांचा मृतदेह बसमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. प्रवाशांना उभे राहताना पकडण्यासाठी बसच्या छताला जो बार लावलेला असतो, त्याला सुती दोरीच्या सहायाने तेलोरे यांनी गळफास लावून घेतल्याचे आढळून आले. याची माहिती मिळाल्यानंतर संगमनेर शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. घटनास्थळी पोलिसांना चिठ्ठी मिळाली आहे. त्यामध्ये सुमारे साडेसहा लाख रुपयांचे कर्ज असल्याचा व त्याला कंटाळल्याचा उल्लेख आहे. मात्र, यामध्ये कोणालाही जबाबदार धरणारा नमोल्लेख पोलिसांना आढळून आला नाही. पोलिसांनी ही माहिती तेलोरे यांच्या कुटुंबियांना कळविली असून ते संगमनेरला निघाले आहेत. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे. कुटुंबाकडे चौकशी झाल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
एसटी चालक सुभाष तेलोरे हे कोल्हार तालुक्यातील पाथर्डी येथील निवासी असून ते एसटी महामंडळात चालक पदावर कार्यरत होते. त्यांच्यावर कर्ज होते आणि कर्जाचा बोजा वाढत असल्याने त्यांनी इतकं टोकाचं पाऊल उचलत आपलं आयुष्य संपवलं असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या प्रकरणी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये.
“केंद्रीय जोर लावूनही ठाकरे सरकार पडत नसल्याने विरोधी पक्षाच्या तोंडाला फेस”
एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन हा मुद्दा अनेक दिवसांपासून चर्चेत होता. एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नाही आणि त्यामुळे घरदार कसे चालवायचे कसे असा प्रश्नही एसटी कर्मचाऱ्यांना पडत आहे. त्यानंतर एसटी कामगार संघटनेने न्यायालयातही धाव घेतली होती. त्यानंतर या महिन्याच्या सुरुवातीस थकित पगार एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात झाला.
कोरोनामुळे एसटी महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा तोटा झालेला आहे. त्यामुळे कामगारांना पगार देण्यासाठी एसटी महामंडळाकडे पैसे नव्हते. परिणामी कामगारांचे वेतन थकीत होते. यामुळे शासनाने एक हजार कोटीची आर्थिक मदत करण्यात आली होती. त्यामुळे गेल्या वर्षी एसटी बस वाहतूक बंद असताना शासनाकडून मिळालेल्या निधीतून कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले होते. मात्र, आता हा निधी सुद्धा संपला असून कर्मचाऱ्यांचा वेतनाचा आणखी प्रश्न निर्माण झालेला आहे. या सर्वांमुळे महामंडळातील ९७ हजार कर्मचारी आणि अधिकारी यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.