नाशिक : लहान मुलगी अनया सतत विचारायची, आई पप्पा कधी येणार? तिच्यासाठी आईकडे उत्तर नसायचं. अखेर आर्थिक विवंचना, प्रचंड निराशेच्या गर्तेत गेलेल्या सुजाता प्रवीण तेजाळे या महिलेनं आपल्या मुलीसह गळफास घेत आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना शनिवारी नाशिकमध्ये उघड झाली. सुजाता यांच्या आत्महत्येनंतर घरात एक सुसाईट नोट सापडली आहे. ही सुसाईट नोट वाचून सर्वच जण गहिवरून गेले.
सुजाता यांचे पती प्रवीण पंडित तेजाळे यांचं पाच महिन्यांपूर्वी कोरोनामुळे निधन झालं. पतीच्या निधनानंतर सुजाता एकट्या पडल्या होत्या. तेव्हापासून त्या प्रचंड निराशा आणि अडचणींचा सामना करीत होत्या. तर मुलगी अनया त्यांना सतत पप्पा कधी येणार हे विचारायची. त्यांनी मुलीला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिला ते समजलं नाही. सुजातांच्या मनानंही ते नीटसं स्वीकारलं नाही. यामुळं त्या मनानं अजून खचल्या. त्यातूनचं त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली. देवाघरून पप्पा येत नाहीत, म्हणून देवाघरी जाण्याचा निर्णय घेतला आणि लहानग्या अनयासह या जगाचा निरोप घेतला. काळीज हेलावून टाकणाऱ्या या घटनेनं नाशिककरांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
सुजाता तेजाळे यांची सुसाईड नोट
मी सुजाता प्रवीण तेजाळे, मी माझ्या स्वतःच्या इच्छेने आयुष्य संपवत आहे. पत्रास कारण की, माझे पती प्रवीण पंडित तेजाळे हे अचानक कोरोनात गेले तेव्हापासून माझे आयुष्य संपल्यासारखा आहे. आयुष्य खूप मोठं असतं पण एकट्याने राहण्यात अर्थच नाही. ना कुणाशी बोलण्याची इच्छा ना कुणाला भेटण्याची इच्छा होते. परंतु इतके दिवस फक्त मुलीसाठी कसेतरी आयुष्य काढत होते. सध्या ती खूप लहान आहे पुढे तिचे देखील आयुष्य आहे. परंतु तिलाही पप्पांची सतत आठवण येते पप्पा देवाघरी गेले आहे हे, मी तिला काही दिवसांपूर्वी समजावून सांगितलं, पूजा केल्यानंतर पप्पा येतील हे मी तिला समजावून सांगितल्यानंतर काही दिवस ती शांत राहिली. आता मात्र पुन्हा ती सतत पप्पा कधी येणार हा एकच प्रश्न मला विचारत राहते, मी पूजा केली तरीही पप्पा काय येत नाही.
या तिच्या प्रश्नाला मी काय उत्तर देऊ , आज सकाळी झोपेतून उठल्यावर अचानक ती मला म्हणाली, ‘मम्मी पप्पा नाही तर तू पण दुःखी राहते मी पण sad राहते, आपण पप्पांकडे जाऊयात’ तिच्या या प्रश्नावर मी आज खूप विचार केला. जर पुढे मलाच काही झालं तर तिचं काही होईल तिला सोडून जाणं शक्य नाही. म्हणून तिच्या त्याप्रमाणे मीही करणार आहे, आमच्या दोघींच्या आयुष्यात आता सुख नाही आयुष्यात जगण्यासाठी पैसा सर्व काही नसतो, असं आयुष्य काढणं खूप कठीण आहे. जसा जन्म देताना त्रास झाला तसं थोडं मन घट्ट करुन हे करणार आहे. आणि हे करताना तिला सांगणार आहे की, आपण आता पप्पांकडे चाललो आहोत. अशी समजूत काढत आमचे आयुष्य मी आता संपत आहे. ह्यात मी जन्म देती वैरीण नाही. ह्या जगात खूप वाईट आणि विचित्र लोक आहेत. म्हणून हा असाही बराच विचार करून तिला जसा जन्म दिला तसंच तिची काळजी करून तिलासोबत घेऊन चालले आहे. बापाशिवाय अर्थ नाही आणि नवऱ्याशिवाय ही अर्थ नाही’















