श्रीरामपूर – कांद्याच्या दरवाढीचा आलेख दिवसागणिक वाढत असल्याने ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आले आहे. अशातच श्रीरामपूर बाजार समितीत कांद्याच्या भावाने ‘दहाहजारी’ पार केली आहे. श्रीरामपूर कृषि उत्पन्न बाजार समितीत काल 1500 कांदा गोण्यांची आवक होऊन लिलावात 15 गोणी कांद्याला 10 हजार 100 रुपयांचा दर मिळाला. एक नंबर कांदा 8000 हजार ते 10 हजार 100, दोन नंबर कांदा 6000 ते 7000, तीन नंबर कांदा 2000 ते 5000 तर गोल्टीला 3000 ते 6500 रुपयांचा दर मिळाला.
ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात कांद्याचे नुकसान झाले आहे. त्यातच शेतकर्याकडील मागील वर्षीचा साठवणूक केलेला उन्हाळी कांदाही संपत आला आहे. त्यामुळे सध्या बाजार समितीत आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे कांद्याची मागणी वाढती असल्याने बाजारभाव वाढत असल्याचे दिसून येते. दरम्यान, चालू वर्षी कांद्याने उच्चांकी दर गाठला आहे. मात्र हा दर शेवटच्या टप्प्यात वाढला आहे.














