नवी दिल्ली – 2020 च्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने सुरुवात झाली. राष्ट्रपतींनी दोन्ही सभागृहांना संयुक्तरित्या संबोधित केले. याच दिवशी अर्थमंत्री निर्मला सितारमण आर्थिक सर्वेक्षण सुद्धा सादर करणार आहेत. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे 2020 चे पहिले अर्थसंकल्प असल्याचे म्हटले आहे. दशकाच्या उज्ज्वल भविष्यासाठी मजबूत पायाभरणी करणे हे आम्हा सर्वांचे प्रयत्न राहील असेही पंतप्रधान म्हणाले आहेत. सोबतच, या अर्थसंकल्पात सामान्य लोकांच्या सशक्तिकरणावर सार्थक चर्चा व्हावी असेही ते पुढे म्हणाले.
- राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले, “हे दशक भारतासाठी खूप महत्वाचे आहे. याच दशकात आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. सरकारच्या प्रयत्नातून या शतकाला भारताचे सर्वात मजबूत शतक म्हणून पायाभरणी करण्यात आली आहे. आम्ही भारताचे लोक महापुरुषांचे स्वप्न पूर्ण करू. यात देशाची राज्यघटना मदतीची ठरणार आहे. राज्यघटनेत आम्हाला कर्तव्यांची जाणीव होते. राज्यघटना नागरिकांकडून राष्ट्रहित सर्वोपरी ठेवण्याची अपेक्षा ठेवते. लोकसभेत ट्रिपल तलाक कायदा, ग्राहक संरक्षण कायदा, अनियमित बचत नियोजन कायदा, चिट फंड संशोधन कायदा, मोटार वाहन कायदा असे अनेक कायदे बनवले. यासाठी सर्वच खासदारांचे मी अभिनंदन करतो. राम जन्मभूमी प्रकरणात सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर देशाने परिपक्वता दाखवली आहे. विरोधाच्या नावे कुठल्याही प्रकारचे हिंसाचार लोकशाहीला अपवित्र करत असते. सरकारला लोकशाही रक्षण करण्यासाठीच जनादेश मिळाला आहे. नवीन भारतात विकासाचे नवे पर्व लिहिले जातील. प्रत्येक क्षेत्रात सर्वांचा विकास होईल.
संसद परिसरात काँग्रेसची निदर्शने
राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात कलम 370 आणि नागरिकत्व कायद्याचा देखील उल्लेख केला. यानंतर सभागृहात विरोधकांनी एकच गदारोळ उठवला. तत्पूर्वी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वी काँग्रेसने संसद परिसरात निदर्शने केली. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात झालेल्या निदर्शनामध्ये विरोधी पक्षांच्या खासदारांनी सहभाग घेतला. यामध्ये ‘भारत वाचवा’, ‘संविधान बचाओ’ आणि ‘सीएए नको’ अशा घोषणा देखील देण्यात आल्या.