Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्याच्या विविध भागात समाधानकारक पाऊस!

najarkaid live by najarkaid live
August 4, 2019
in राज्य
0
राज्याच्या विविध भागात समाधानकारक पाऊस!
ADVERTISEMENT

Spread the love

  • राज्याच्या विविध भागात समाधानकारक पाऊस
  • जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे आणि गाळमुक्त धरण योजनांमुळे पाण्याची भरीव बेगमी

मुंबई, दि. 4: मुंबई, ठाणे, रायगड आणि नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर आपत्ती निवारण उपाययोजनेद्वारे शासन यंत्रणा मात करीत असताना उर्वरित भागात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याबाबत खूपच आशादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे आणि गाळमुक्त धरण या योजनांद्वारे राज्यात झालेल्या कामांमुळे पुढच्या वर्षासाठी पाण्याची भरीव बेगमी झाली आहे.
बहुतांश भागात सर्वदूर होत असलेल्या समाधानकारक पावसामुळे गाव शिवारात झालेल्या जलयुक्त शिवार योजनेतील नाला खोलीकरण, सिमेंट बंधारे, सिमेंट नालाबांध, ओढा खोलीकरण, ओढा सरळीकरण, सीसीटी पाण्याने तुडुंब भरले आहेत. गावशिवारातील विहिरी पाण्याने तुडुंब भरल्या आहेत त्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. बीड आणि लातूर जिल्ह्याच्या काही भागात दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

नागपूर विभाग
नागपूर विभागात मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे समाधानकारक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे बळीराजा काही अंशी सुखावला असून शेतीचे कामे सुरू झाली आहे. विभागातील गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने सर्वाधिक पाऊससाठ्याची नोंद झाली आहे. उर्वरीत जिल्ह्यांमध्ये कमी पावसाची नोंद झाली आहे.
नागपूर विभागात एकूण 18 मोठे धरण असून 40 मध्यम प्रकल्प, 314 लघु प्रकल्प आहेत. यातील 18 मोठ्या प्रकल्पामध्ये एकूण 26.47 टक्के पाणीसाठ्याची आजपर्यंत नोंद झाली आहे. त्यातील चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा, वर्धा जिल्ह्यातील पोथरा येथील धरण 100 टक्के भरले आहे. नागपूर जिल्ह्यातील वेणा प्रकल्पात 69.97 टक्के पाणीसाठा भरला आहे. गोंदिया जिल्ह्यातील पुजारीटोला या धरणात 56.60 टक्के व धापेवाडा बॅरेज टप्पा 2 या प्रकल्पात 47.26 टक्के पाणीसाठ्याची नोंद झाली आहे. भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीवरील गोसेखुर्द प्रकल्पात 38.38 टक्के पाणीसाठ्याची नोंद आहे.
नागपूर विभागातील 40 मध्यम प्रकल्पातील एकूण पाणीसाठ्याची नोंद 44.37 झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक 79.80 टक्के पाणीसाठ्याची नोंद झाली असून नलेश्वर, चंदई, चारगाव, लभानसराड या मध्यम प्रकल्पामध्ये 100 टक्के पाणीसाठ्याची नोंद झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील एंगलखेडा व रेगडी प्रकल्पामध्ये 100 टक्के पाणीसाठ्याची नोंद झाली आहे.
नागपूर जिल्ह्यातील एकूण 13 मध्यम प्रकल्पांमध्ये 37.84 टक्के पाणीसाठ्याची नोंद झाली आहे. त्यातील पांढराबोडी, मकरधोकडा, सायकी या मध्यम प्रकल्पात 100 टक्के पाणीसाठा भरला आहे. भंडारा जिल्ह्यातील 4 मध्यम प्रकल्पांमध्ये 25.33 टक्के व गोंदिया जिल्ह्यात एकूण 16.17 टक्के पाणीसाठ्याची नोंद झाली आहे. वर्धा जिल्ह्यातील 5 प्रकल्पांमध्ये 52.01 टक्के पाणीसाठ्याची नोंद झाली आहे.
वर्धा जिल्हयात जून ते आजपर्यंत एकूण सरासरीच्या 52 टक्के पाऊस पडला आहे. यामुळे नदी – नाल्याची पाणी पातळीत वाढ झाली असून धरणातील पाणी साठ्यात सुद्धा वाढ झाली आहे. जिल्हयात 1 मोठा प्रकल्प 5 मध्यम प्रकल्प व 25 लघु प्रकल्प आहे. तर शेजारील जिल्हयातील नागपूर –अमरावती व यवतमाळ जिल्हयातील 4 प्रकल्प असून या 4 प्रकल्पातील पाण्याचा वर्धा जिल्हयातील शेतक-यांना लाभ होतो. वर्धा जिल्हयातील मध्यम प्रकल्प लाल नाला, पोथरा 100 टक्के टक्के भरला असून त्याचे 5 गेट 25 सेमी ने उघडले असून त्यातून पाण्याचा विसर्ग आहे. इतर तीन लघु प्रकल्प 50 टक्के भरले आहेत. मागील आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे पिकांची परिस्थिती चांगली आहे. या पावसामुळे जलयुक्त शिवार आणि गाळ मुक्त धरण योजनेमध्ये झालेल्या कामांमुळे नाल्यांमध्ये आणि तलावात पाणी साठ्यात वाढ झाली आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना रब्बी हंगामात पिकांना पाणी देण्यासाठी होणार आहे.
भंडारा जिल्ह्यात पावसाची स्थिती समाधानकारक असून आजपर्यंत जिल्ह्यात 81 टक्के पाऊस पडला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक 141 टक्के पाऊस पवनी तालुक्यात झाला. तर सर्वात कमी 62 टक्के पाऊस लाखनी तालुक्यात झाला. पावसाची हजेरी समाधानकारक आहे. भंडारा जिल्ह्यात गोसेखुर्द व बावनथडी ही दोन मोठी धरण आहेत. गोसेखुर्द धरणात 38.38 टक्के जलसाठा निर्माण झाला आहे. वैनगंगा नदीची मृत पातळीत 237 मीटर असून आजची पातळी ( कारधा पूल भंडारा येथे) 243 मीटर आहे. पाणी पातळीत 6. 04 गेजची वाढ आहे.
भंडारा जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा असून या पावसामुळे तलाव, नदी, नाले आणि शेततळी भरली आहे. जलयुक्त शिवारची शेततळे या पावसाने भरली आहेत. याचा उपयोग शेतकऱ्यांनी पऱ्हे जगविण्यासाठी व चिखलानीसाठी मोठ्या प्रमाणात केला आहे. आठ दिवसापूर्वी रोवणी कशी करावी या विवंचनेत शेतकरी होता. धानाची पऱ्हे कोमेजून जाण्याच्या स्थितीत होती. जिल्ह्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकरी आनंदला असून रोवणीची कामे जोमाने सुरू आहेत.
गडचिरोली जिल्हयामध्ये दरवर्षी प्रमाणे वेळेत पाऊस झाला नसला तरी उशिरा का होईना पण पावसाने चांगली हजेरी लावली. रविवारी सकाळपर्यंत सरासरीच्या 107 टक्के पाऊस झाला आहे. एकूण पावसाळयात पडणा-या पावसापैकी 60 टक्के पाऊस पडलेला आहे. रविवार दुपारपर्यंत पोहार नदी, वैणगंगा नदी, प्राणहिता नदी, वर्धा नदी काही ठिकाणी धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे. पर्लकोटा नदीमुळे भामरागड येथे पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील तलावातील गाळ काढल्याने तलाव हे पाझरण्याची क्षमता वाढलेली आहे. आज मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे पाणी हे जमिनीत पाझरून जलसमृद्धीचे कार्य झालेले आहे. 15 दिवसांपुर्वी गडचिरोली दुष्काळ परिस्थितीमध्ये होता. झालेल्या पावसामुळे शेततळयांमध्ये पाणीसाठा होण्यास मदत होईल आणि त्याचा फायदा धान शेतीला होईल.
अमरावती विभाग
विभागात 9 मोठे 24 मध्यम तर 469 लघुप्रकल्प आहेत. मोठ्या प्रकल्यापैकी यवतमाळ जिल्ह्यातील बेबळा या प्रकल्पाचा अफवाद वगळता अन्य प्रकल्पात 50 टक्क्यापेक्षा कमी पाणीसाठा झालेला आहे. 9 प्रकल्पात मिळून सरासरी 23.4 टक्के पाणीसाठा झाला आहे. विभागातील 24 मध्यम प्रकल्पात सरासरी 40.85 टक्के पाणीसाठा झालेला असून अमरावती जिल्ह्याती सपण, यवतमाळ जिल्ह्याती सायखेडा, बुलढाणा जिल्ह्यातील पलढग या प्रकल्पातून पाणी सोडण्यात येत आहे. आज कुठेही पूर परिस्थिती नाही. विभागातील 469 लघुप्रकल्पात 17.13 टक्के पाणीसाठा आहे. विभागातील एकूण 502 प्रकल्पातील पाणीसाठ्याची टक्केवारी 24.95 टक्के एवढी आहे. मात्र, अमरावती विभागात जलयुक्त शिवार मोहिमेत विविध कामे झालेली असल्याने शेततळी, नाला खोलीकरण, नाला रुंदीकरण अशा कामांचे यश दिसू लागेल. समृध्दी महामार्गाच्या माध्यमातून खोदण्यात आलेल्या शेततळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा होत आहे.
अमरावती जिल्ह्यात पावसाचे प्रमाण 1 जून ते 3 ऑगस्ट या कालावधीत अपेक्षित पाऊसमानाच्या 93.8 टक्के तर वार्षिक सरासरीच्या 51.9 टक्के आहे. अकोला जिल्ह्यात पावसाचे हे प्रमाण 1 जून ते 3 ऑगस्ट या कालावधीत अपेक्षित पावसाच्या 101.7 टक्के तर वार्षिक सरासरीच्या 56.9 टक्के आहे. यवतमाळ जिल्ह्यात पावसाचे प्रमाण 1 जून ते 3 ऑगस्ट या कालावधीत अपेक्षित सरासरीच्या 62.9 टक्के तर वार्षिक सरासरीच्या तुलनेत 35.5 टक्के एवढे आहे. तर बुलडाणा जिल्ह्यात पावसाचे हे प्रमाण 1 जून ते 3 ऑगस्ट कालावधीत अपेक्षित सरासरीच्या 107.0 टक्के तर वार्षिक सरासरीच्या 58.9 टक्के एवढे आहे.
वाशिम जिल्ह्यात पावसाचे प्रमाण 1 जून ते 3 ऑगस्ट या कालावधीतील अपेक्षित सरासरीच्या 67.4 टक्के तर वार्षिक सरासरीच्या 37.9 टक्के इतके आहे.
औरंगाबाद विभाग 
औरंगाबाद जिल्ह्यात जायकवाडी हे पैठण येथे असणारे मोठे धरण आहे. धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसानंतर विविध धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. रविवार सकाळपर्यंत जायकवाडी धरणातील पाण्याची टक्केवारी 15 टक्के एवढी होती. औरंगाबाद जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. जिल्ह्यात एकुण 39.43 टक्के एवढा पाऊस झाला आहे. सर्वात जास्त सिल्लोड तालुक्यात 56 टक्के एवढा तर सर्वात कमी पैठण तालुक्यात 25.73 टक्के एवढा पाऊस झाला आहे. मात्र झालेल्या पावसामुळे जलयुक्त शिवार अंतर्गत ‍जिल्ह्यात झालेल्या कामांना लाभ मिळणार आहे.
परभणी जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून रिमझिम हजेरी लावणाऱ्या पावसाने शुक्रवारी रात्री उशिरा सर्वदूर दमदार हजेरी लावली. शनिवारी पहाटे पावसाचा जोर वाढला होता या पावसामुळे पाणीपातळी वाढण्यास मदत होणार आहे. पूर्णा तालुक्यातील चुडावा मंडळात अतिवृष्टी झाली आहे. तर पालम तालुक्यातील लेंडी नदीला पाणी वाहिले आहे. परभणी शहरासह ग्रामीण भागात पाऊस झाला. पूर्णा, गंगाखेड भागात पावसाचा जोर अधिक होता. सेलू, पाथरी परिसरात ही पाऊस पडला. तर जिंतूर व सोनपेठ परिसरात चांगला पाऊस झाला आहे.
जिल्हातील प्रकल्पामधील पाणी वाढण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा केली जात आहे. जिल्हात असलेल्या गोदावरी, दुधना,करपरा,मासोळी, या प्रमुख नद्या अद्यापही कोरड्याच आहेत. दोन दिवसांपासून झालेल्या पावसामुळे पूर्णा नदी वाहती झाली असून येलदारी प्रकल्पातील जलसाठ्यातही काही अंशी पाणी वाढले आहे. जिल्हात असलेल्या नऊ प्रकल्पाची साठवण क्षमता ही 109.58 दलघमी इतकी आहे तर प्रत्यक्षात केवळ 0.76 दलघमी जलसाठा या प्रकल्पात उरला आहे.

जालना जिल्ह्यात अपेक्षित पावसाच्या 36.06 टक्के एवढा पाऊस झाला आहे. जिल्ह्यात गेल्या चार ते साडेचार वर्षात जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जलसंधारणाची मोठ्या प्रमाणात कामे करण्यात आली. जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे पडणाऱ्या पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी या कामांमध्ये चांगल्या प्रमाणात पाणी साठले असून भोकरदन, जाफ्राबाद, अंबड, घनसावंगी व परतूर या तालुक्यांमध्ये नाला खोलीकरण, कंपार्टमेंट बंडीग, सिमेंट बंधारा ही कामे झाल्यामुळे विकेंद्रीत पाणी साठे निर्माण झाले आहे. सध्या शेतकऱ्यांच्या विहिरीला पाणी येत आहे. मुळस्थानी जलसंधारण झाल्याने जमिनीमध्ये ओलाव्याचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यात असलेल्या विविध प्रकल्पांमध्ये झालेल्या पावसामुळे अल्पशा प्रमाणात पाणी पातळीत वाढ झाली असून अजून पुरेशा पावसाची प्रतिक्षा आहे.
बीड जिल्ह्यात या पावसाळी हंगामात सरासरीच्या तुलनेत अजूनही कमी पाऊस आहे. जिल्ह्यात वार्षिक सरासरीपेक्षा कमी पाऊस आहे. या जिल्ह्यात सर्वत्र पिकांची पेरणी आणि लागवड झाल्याचे दिसून येत आहेत परंतु बंधारे आणि धरणांमध्ये अजुनी कमी पाऊस आहे. काही तालुक्यांमध्ये तुलनेत पेरणी उशिरा झालेली आहे. बीड जिल्ह्यातील सिंदफणा, बिंदुसरा, मांजरा या नद्यांमध्ये अजून वाहते पाणी दिसून आलेले नाही. दोन तीन वेळा सलग झालेल्या पावसामुळे एक-दोन दिवस पाणी वाहिले पण नंतर अजूनही नदीपात्र कोरडी आहेत. बीड जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या गोदावरी नदीचे देखील पात्र अजूनही वाहते झालेले नाही. नाशिक नगर जिल्ह्यात होणाऱ्या पावसामुळे जायकवाडी मध्ये येणाऱ्या पाण्याचा प्रवाह वाढला असला तरी जायकवाडी धरणाच्या खालील बाजूस असणाऱ्या बीड जिल्हा कडे पाण्याचा प्रवाह वाढलेला नाहीत
परभणी जिल्ह्यात ढगाळ वातावरण असले तरी पाऊसाचा जोर नाही. रविवार सकाळपर्यंतच्या मागील 24 तासात सरासरी 5.23 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी 774.62 मि.मी. असून 1 जूनपासून आजपर्यंत जिल्ह्यात सरासरी 230.28 मि.मी. पाऊस झाला आहे.
लातूर जिल्ह्यात मागील वर्षी सरासरीच्या 64 टक्के पर्जन्यमान झालेले होते. जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत मोठ्या प्रमाणावर कामे झालेली असल्याने जलसाठेमध्ये पाणी बऱ्यापैकी साठलेले होते. रविवार सकाळपर्यंत लातूर जिल्ह्यात सरासरीच्या 28 टक्के प्रजन्यमान झालेले आहे. हे प्रजन्यमान अपेक्षित प्रजन्यमानाच्या जवळपास निम्म्यापेक्षा कमी आहे. लातूर जिल्हा पाणीपुरवठा करणाऱ्या धनेगाव येथील मांजरा धरणातील पाणीसाठाही अत्यल्प राहिलेला आहे हा पाणीसाठा मूर्त साट्याच्या सुद्धा अल्पसा आहे व इतर साई व नागझरी बॅरेज मध्येही पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही. व मांजरा धरणातील पाणी सप्टेंबरपर्यंत पुरेल इतके आहे.
लातूर जिल्ह्यात मागील पाच वर्षात जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जवळपास 700 गावांमध्ये जलसंधारणाची पाच हजार पेक्षा अधिक कामे पूर्ण झालेले आहेत. या जलयुक्त च्या कामामुळे जिल्ह्यात सन 2016 -17 मध्ये एकही टॅंकर नव्हते तर 2017-18 मध्ये फक्त 4 टँकर होते. मागील वर्षी सरासरीच्या फक्त 64% पाऊस झाला असल्याने सन 2018-19 मध्ये 105 टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. पण लातुर जिल्ह्यात परतीचा पाऊस चांगला पडत असल्याने आणखी पाऊस पडण्याची शक्यता आहे. व हा पाऊस झाल्यास जलयुक्तच्या सर्व कामात पाणी साठवले जाऊन पिण्याचा पाण्याचा तसेच शेतीला पूरक सिंचनाचा प्रश्न सुटला जाणार आहे. हे जलयुक्तच्या कामाचे यश असेल.
उस्मानाबाद जिल्हयात रविवार सकाळपर्यत 202.41 मि.मी. पाऊस झाला आहे.जिल्हयात ढगाळ वातावरण असले तरी पावसाचा जोर नाही. उस्मानाबाद जिल्ह्यात अजूनही समाधानकारक असा पाऊस नाही. जिल्ह्याला अजूनही चांगल्या पावसाची नितांत गरज आहे.
नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 389.41 मि.मी. पावसाची नोंद झाली असून 40.47 टक्के एवढा पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील गोदावरी, पेनगंगा, मांजरा असना, लेंडी, कयाधू, मनार या सात प्रमुख नद्या आहेत. या नद्यांच्या पाणी पातळीत अल्पशी वाढ झालेली आहे. मात्र जिल्ह्यामध्ये पुरेशा पावसाची प्रतीक्षा आहे.
हिंगोली जिल्ह्यात मागील सात दिवसापासून रिमझीम पावसास सुरुवात झाल्याने खरिपाच्या पिकांना जीवनदान मिळाले आहे. तरी अद्यापपर्यंत मोठा पाऊस झालेला नाही. काही ठिकाणची तलाव, लघू बंधाऱ्यातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. परंतु मोठ्या प्रकल्पातील पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ अपेक्षित आहे. शनिवारी पावसाने उसंत घेतल्याने शेतकऱ्यांनी फवारणी, कोळपणीच्या कामास सुरुवात केल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील सर्व तालूक्यात काही दिवसापासून पावसाच्या सरी पडत असल्याने या सरी खरीप पिकांसाठी लाभदायक आहे. जिल्ह्याच्या 892 मि.मी. पावसाची वार्षिक सरासरी असून जिल्ह्यात आजपर्यंत सरासरी 352 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या आज अखेर 39 टक्के इतकी पावसाची नोंद झाली आहे.

पुणे विभाग
पुणे विभागात सोलापूर जिल्हा आणि पुणे जिल्ह्याचा पूर्व भाग वगळता सातारा जिल्ह्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही धरणांसह विभागातील इतर धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून कोयना धरणात रविवारी सकाळी ११ वाजेपर्यंत ९४.९४ टिएमसी पाणी साठा झाला असून उजनी धरणातही ८८.७९ टिएमसी पाणी साठा झाला आहे. पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आलेल्या कामांमध्ये पाण्याचा मोठा साठा झाला असून भूगर्भातील पाणी साठा वाढण्यास मदत होणार आहे. या पावसामुळे विभागातील खरिपाच्या पीकांना नवसंजीवनी मिळाली आहे.
लोणावळा जलाशयात लक्षणीय वाढ झाली आहे. भामआसखेड धरणातून भामा नदीला विसर्ग वाढविण्यात आला आहे. मुळशी धरण क्षेत्रात अतिवृष्टी सुरू असून शनिवारी आणि रविवारी ९०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुळशी धरणातून विसर्ग सुरू आहे, चासकमान धरण परिसरात पर्जन्य वाढल्यामुळे भीमा नदीला विसर्ग सुरू आहे.
पुणे जिल्ह्यातील पश्चिम भागात सुरू असणाऱ्या संततधार पावसामुळे पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला, वरसगाव, टेमघर, पानशेत ही चार धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पुणेकरांना वर्षभराच्या पाण्याची बेगमी झाली आहे. जिल्हृयात सुरू असणाऱ्या पावसाने धरणातून पाणी सोडण्यात येत असून नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. संततधार पडणाऱ्या पावसाने पुण्यात जुलैमधील गेल्या दहा वर्षांतील “रेकॉर्ड’ मोडले. यापूर्वी 2014 मध्ये 282.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. या वर्षी जुलैच्या तीस दिवसांमध्ये 359.2 मिलिमीटर पाऊस नोंदला असल्याची माहिती हवामान खात्याने दिली.
खडकवासला धरणातून विसर्ग चालू असून धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस चालू असल्यामुळे व पानशेत आणि वरसगाव धरणे शंभर टक्के भरली असल्यामुळे त्या दोन्ही धरणातून विसर्ग चालू असून पावसाचा जोर धरण क्षेत्रामध्ये वाढलेला असल्यामुळे खडकवासला धरणातून एकूण 41756 क्युसेक्स इतका विसर्ग मुठा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. चासकमान धरण परिसरात व भिमाशंकर भागात अतिवृष्टी चालू असून गेल्या २४ तासात ३०० मि.मी. पावसाची नोंद झालेली आहे. चासकमान धरणातून ५०१२० क्युसेक्स विसर्ग करण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार यानंतर विसर्ग वाढवण्यात येईल.
सोलापूर जिल्ह्यासाठी उजनी धरण अत्यंत महत्वाचे आहे. पुणे जिल्ह्यातील पावसामुळे उजनी धरणातील पाणी साठ्यात चांगली वाढ होत आहे. ही सोलापूर जिल्ह्यातील सर्वांना आनंद देणारी बाब आहे. उजनी धरणात आज 88.79 टीएमसी पाणी साठा होता.
वीर धरणातून निरा नदीच्या पात्रात ६० हजार क्युसेस पाणी सोडल्यामुळे नीरा नदीत पाणी आले आहे. वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे निरा आणि भीमा नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे दोन्ही नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नीरा नदीचे पाणी नीरा नृसिंहपूर संगम येथून भीमा नदीला मिळते व त्याचा फायदा जिल्ह्यातील भीमा नदीकाठच्या लोकांना होतो. त्यामुळे शेतकरी आनंदी आहेत.
सोलापुरातील सर्व तालुक्यातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. सोलापूरला परतीचा पाऊस पडतो. यंदा परतीचा पाऊस चांगला होईल, असा तज्ञांचा अंदाज आहे. पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांनी पुर्वमशागतीची कामे केली आहेत. जलयुक्त शिवार योजनतून झालेल्या विविध जलस्त्रोतात पाणी साठा होण्याची अपेक्षा जिल्ह्यातील कृषी अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे.
सातारा जिल्ह्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील प्रमुख धरण असणाऱ्या कोयना धरणात रविवारी सकाळी 11 वाजता 94.94 टिएमसी इतका पाणी साठा झाला आहे. धरणातील पाण्याची आवक लक्षात घेता कालपासून दोन फुटांवर असणारे धरणाचे दरवाजे रविवारी दुपारी 1 वाजता 11 फुटांवर करण्यात आले आहेत. त्यामुळे धरणातून कोयना नदीपात्रात 60हजार 63 क्युसेस पाण्याचा विसर्ग आहे.
*नाशिक विभाग*
नाशिक जिल्ह्यात देवळा, कळवण, चांदवड आणि नांदगाव वगळता इतर तालुक्यात चांगला पाऊस झाला आहे. नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्याने सरासरीची शंभरी आत्ताच गाठली आहे. गंगापूर, दारणा, चणकापूर, कडवा, मुकणे, करंजवण या मोठ्या प्रकल्पात चांगला जलसाठा झाला आहे. सिन्नरसारख्या नेहमी टंचाईच्या झळा सोसणाऱ्या तालुक्यातही चांगला पाऊस झाल्याने जलसंधारणाच्या कामांचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. त्र्यंबकेश्वर व नाशिक येथे रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने गोदवारी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून 1 लाख 10 हजार क्युसेक्स विसर्ग गोदवारी पात्रात होत असल्याने जायकवाडी धरणातील पाणी पातळी वाढण्यात मदत होणार आहे.
अहमदगर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 270 मिलीमीटर अर्थात सरासरीच्या 54 टक्के पावसाची नोंद झाली आहे. धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने नागरिकात समाधानाची भावना असली तरी काही तालुक्यांना दमदार पावसाची प्रतिक्षा आहे. धरण पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने नदीपात्रातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. जिल्ह्यात अकोले, संगमनेर आणि पारनेर तालुक्यात शनिवारी चांगला पाऊस झाला. भंडारदरा आणि आढळा धरणे भरली आहेत. मुळा आणि निळवंडे धरण क्षेत्रातही चांगला पाऊस सुरू असल्याने तीदेखील भरण्याची शक्यता आहे.
नंदुरबार जिल्ह्यात गेल्या आठवडाभरातील पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत एकूण सरासरीच्या 57 टक्के पाऊस झाला आहे. तर 4 ऑगस्टपर्यंतची सरासरी पावसाने ओलांडली आहे. गेल्या वर्षी केवळ 63 टक्के पाऊस झाल्याच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचा चांगला पाऊस शेतकरी आणि नागरिकांनाही सुखावणारा आहे. विशेषत: गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. जिल्ह्यातील प्रकल्पात चांगला पाणीसाठा झाला असून नंदुरबार तालुक्यातील टंचाईग्रस्त भागातही पावसाने चांगली हजेरी लावल्याने तालुक्यातील पाणी टंचाई दूर होण्यास मदत झाली आहे. या आठवड्यातील पावसामुळे संकटात आलेली पिके वाचू शकतील. विरचक धरणात चांगला पाणीसाठा झाल्याने नंदुरबारची पाणी समस्या दूर होण्यास मदत होणार आहे.
जळगाव जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 663 मिमी इतके असून जिल्ह्यात आतापर्यंत 46% इतका पाऊस पडला आहे. मोठ्या प्रकल्पापैकी हतनूर धरणात 19% गिरणा धरणात 13% तर वाघूर धरणात 30% इतका पाणीसाठा शिल्लक आहे. मध्यम प्रकल्पापैकी गुळ, मन्याड, सुकी प्रकल्पात 50% पाणीसाठा असून तोंडापूर धरण 100% भरले आहे. तर इतर धरणामध्ये अजून पाहिजे असा पाणीसाठा झालेला नाही.
हतनूर धरणाचे सध्या 8 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहे. धरणातून 829 क्युमेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गिरणा धरणाच्या क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, पाचोरा या तालुक्यातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी मिटण्यास मदत होणार आहे. तर वाघूर धरणातील पाणीसाठा वाढल्याने जळगाव शहर व जामनेर शहराचा पाणीप्रश्न सुटणार आहे.
जिल्ह्यात ऐन पेरणीच्या वेळी सुरू असलेल्या पावसामुळे पिकाला मदत होत असून यामुळे मागील वर्षी पेक्षा यावर्षी 20% पेरणीचे क्षेत्र वाढले आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात मागील चार वर्षांत झालेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या कामामुळे अनेक गावामध्ये शाश्वत सिंचनाची सोय झाली आहे. भविष्यात अजून चांगला पाऊस पडल्यास या गावात पाणी साठण्यास जलयुक्त च्या कामाची मदत होणार आहे. एकूणच जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे पिकांचा व काही गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी मदत होत आहे. तसेच अनेक गावात सुरू असलेले टॅंकर बंद झाले आहे..
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात मालनगाव, पांझरा, जामखेडी धरण 100 टक्के भरले आहे. पांझरा नदीवरील अक्कलपाडा धरण भरण्याच्या मार्गावर आहे.
कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी पावसाचा जोर कमी राहिला तरीही पंचगंगा नदीच्या पाण्यात वाढ होत आहे. विविध नद्यांवरील ८६ बंधारे पाण्याखाली गेले आहेत त्यामुळे येथील वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे. राजाराम बंधारा येथे पंचगंगा ४४.५ फुटावर गेल्याने पुराचे पाणी परिसरात झपाट्याने पसरत आहे. राधानगरी धरण ९९ टक्के तर वारणा धरण ९७ टक्के, तुळशी धरण ९२ टक्के, दुधगंगा ७८ टक्के भरले आहे. जिल्ह्यातील १० धरणांमधून प्रती सेकंद ३७ हजार ६०२ घनफुट विसर्ग सुरु असल्याने शेती आणि परिसरातील पाणी पातळी वाढली आहे.
*सांगली* जिल्ह्यात सर्वाधिक शिराळा तालुक्यात 92.8 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. तर सर्वात कमी आटपाडी तालुक्यात 5.3 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
सध्या कोयना धरणातील पाणीसाठा 94.94 टी.एम.सी. असून वारणा धरणात 33.20 टी.एम.सी. इतका पाणीसाठा आहे. कोयना धरणातून दुपारी एक वाजल्यापासून 65053 क्युसेक्स तर वारणा धरणातून 20472 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे धरणातून पाणीविसर्ग वाढणार असून कृष्णा व वारणा नदीपातळीमध्ये सातत्याने वाढ होणार आहे. आलमट्टी धरणातून 2 लाख 58 हजार 710 क्युसेक्स विसर्ग. आलमट्टी धरणाची पाणी पातळी स्थिर ठेवण्याबाबत पाटबंधारे विभागाद्वारे समन्वय ठेवण्यात येत आहे.
कोकण विभाग
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. जिल्ह्यातील सर्व लघू पाटबंधारे प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. तर 19 प्रकल्प 100 टक्के भरले आहेत. तिलरी आंतरराज्य प्रकल्प सुमारे 90 टक्के भरला असुन त्यातून 402 घ.मी विसर्ग सुरु आहे. कर्ली नदीची पातळी 7 मीटर असुन वघोतं नदीची पातळी 3.5 मीटर आहे. यंदाच्या पावसाळ्यात होत असलेल्या दमदार पावसामुळे गेल्यावर्षी गाळ काढण्यात आलेल्या सुमारे 30 लहान व मोठ्या तलावात चांगला पाणी साठा झाला आहे.

ठाणे जिल्ह्यात आतापर्यंतच्या सरासरी पावसाच्या तुलनेत १०७ टक्के पाऊस झाला आहे. भातसा धरणातील पाणीसाठा ८५८.३६२ दलघमी म्हणजेच ९१.११ इतकी आहे. मोडक सागर मधील पाणीसाठा १२८.९३ दलघमी असून हा तलाव १०० टक्के भरला आहे. तानसा प्रकल्पातील पाणीसाठा १४५.०८ दलघमी इतका आहे. हे धरण देखील १०० टक्के भरले आहे. बारवी धरणातील पाणीसाठा ३२३.०८ दलघमी इतका आहे. उल्हास नदीवरील बदलापूर बंधाऱ्याची आजची पातळी १७.३० मीटर असून इशारा पातळी १६ मीटर आहे. अतिवृष्टीमुळे जवळपास सर्वच धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊन दुथडी वाहत आहेत.
पालघर जिल्ह्यात आज सकाळी संपलेल्या २४ तासात सरासरी १९०.०८ मिमी पाऊस पडला असून जूनपासून आतापर्यंत एकूण २२५७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंतच्या सरासरी पावसाशी त्याचे प्रमाण १४५.१६ टक्के इतके आहे. जिल्ह्यातील सूर्या नदीची (मासवण) पाणी पातळी ७ मीटर असून इशारा पातळी ११ मीटर आहे. वैतरणा नदीची पातळी १०२.०५ मीटर तर इशारा पातळी ११.९० आणि धोका पातळी १०२.१० आहे. पिंजाळ नदीची पातळी १०२.८८ असून इशारा पातळी १०२.७५ तर धोका पातळी १०२.९५ इतकी असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात 04 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात एकूण 1382 मिमी तर सरासरी 153.56 मिमी पाऊस झाला आहे. सर्वाधिक पावसाची नोंद दापोली तालुक्यात 225 मिमी तर सर्वात कमी पावसाची नोंद गुहागर तालुक्यात 81 मिमी झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात एक व राजापूर तालुक्यात एक आणि संगमेश्वर तालुक्यात एक असे तीन मध्यम पाटबंधारेप्रकल्प असून तिन्हींमधील एकूण उपयुक्त पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. याशिवाय जिल्ह्यात 60 लघुपाटबंधारे प्रकल्प असून 60 लघुपाटबंधारे प्रकल्पांपैकी 48 लघुपाटबंधारे शंभर टक्के भरले आहेत.


Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

संत शिरोमणी सावता माळी पुण्यतिथी व गुणगौरव उत्साहात

Next Post

जपानच्या आंतराष्ट्रीय चर्चासत्रात अनुभूती स्कूलचे प्रतिनिधीत्व !

Related Posts

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Cabinet meeting Maharashtra

आजच्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे 4 धडाकेबाज निर्णय वाचा!

August 19, 2025
प्रवीणसिंह पाटील (राजपूत) बने श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्ष

प्रवीणसिंह पाटील (राजपूत) बने श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्ष

August 18, 2025
मुख्यमंत्री फडणवीस यांचा राज्यपाल राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबद्दल अभिनंदन

मुख्यमंत्री फडणवीस यांचा राज्यपाल राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबद्दल अभिनंदन

August 18, 2025
Jalgaon news : जिल्हा नियोजन मधून झालेल्या कामाचे विशेष कौतुक ;   येत्या बजेट मध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून  – उपमुख्यमंत्री अजित पवार   

Jalgaon news : जिल्हा नियोजन मधून झालेल्या कामाचे विशेष कौतुक ;  येत्या बजेट मध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून – उपमुख्यमंत्री अजित पवार  

August 17, 2025
Next Post
जपानच्या आंतराष्ट्रीय चर्चासत्रात अनुभूती स्कूलचे प्रतिनिधीत्व !

जपानच्या आंतराष्ट्रीय चर्चासत्रात अनुभूती स्कूलचे प्रतिनिधीत्व !

ताज्या बातम्या

PMAY 2025: प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत 3 कोटी नव्या घरांचे बांधकाम

PMAY 2025: प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत 3 कोटी नव्या घरांचे बांधकाम

October 12, 2025
Pune Farm Loan Update 2025: खरीप हंगामात ४ हजार २८९ कोटींचे पीककर्ज वाटप, मागील वर्षाच्या तुलनेत घट

Pune Farm Loan Update 2025: खरीप हंगामात ४ हजार २८९ कोटींचे पीककर्ज वाटप, मागील वर्षाच्या तुलनेत घट

October 12, 2025
Navi Mumbai Cyber Scam: नागरिक फसले Online ₹1 Crore मध्ये

Navi Mumbai Cyber Scam: नागरिक फसले Online ₹1 Crore मध्ये

October 12, 2025
Professor Recruitment Maharashtra 2025: विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये 12,000+ रिक्त पदे भरणार

Professor Recruitment Maharashtra 2025: विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये 12,000+ रिक्त पदे भरणार

October 12, 2025
Diwali 2025 Stock Picks: 300-500 रुपये मध्ये गुंतवणुकीसाठी टॉप शेअर्स

Diwali 2025 Stock Picks: 300-500 रुपये मध्ये गुंतवणुकीसाठी टॉप शेअर्स

October 12, 2025
CM Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यात दिवाळी Gift 1500 रुपये जमा; KYC अनिवार्य

CM Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यात दिवाळी Gift 1500 रुपये जमा; KYC अनिवार्य

October 12, 2025
Load More
PMAY 2025: प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत 3 कोटी नव्या घरांचे बांधकाम

PMAY 2025: प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत 3 कोटी नव्या घरांचे बांधकाम

October 12, 2025
Pune Farm Loan Update 2025: खरीप हंगामात ४ हजार २८९ कोटींचे पीककर्ज वाटप, मागील वर्षाच्या तुलनेत घट

Pune Farm Loan Update 2025: खरीप हंगामात ४ हजार २८९ कोटींचे पीककर्ज वाटप, मागील वर्षाच्या तुलनेत घट

October 12, 2025
Navi Mumbai Cyber Scam: नागरिक फसले Online ₹1 Crore मध्ये

Navi Mumbai Cyber Scam: नागरिक फसले Online ₹1 Crore मध्ये

October 12, 2025
Professor Recruitment Maharashtra 2025: विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये 12,000+ रिक्त पदे भरणार

Professor Recruitment Maharashtra 2025: विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये 12,000+ रिक्त पदे भरणार

October 12, 2025
Diwali 2025 Stock Picks: 300-500 रुपये मध्ये गुंतवणुकीसाठी टॉप शेअर्स

Diwali 2025 Stock Picks: 300-500 रुपये मध्ये गुंतवणुकीसाठी टॉप शेअर्स

October 12, 2025
CM Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यात दिवाळी Gift 1500 रुपये जमा; KYC अनिवार्य

CM Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यात दिवाळी Gift 1500 रुपये जमा; KYC अनिवार्य

October 12, 2025

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us