धरणगाव : मुलाला आणि नातेवाईकांना फोन करून ‘मी जग सोडतोय’ असा फोन करीत धरणगाव तालुक्यातील बोरखेडा येथील शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मध्यरात्री शेतात जाऊन कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेतला. कैलास धनसिंग पाटील (वय ५५) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे गावात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.
सततच्या कर्जबाजारीपणाला कंटाळून कैलास पाटील यांनी आत्महत्या केली. त्यांच्यावर विकासो तसेच खासगी मिळून आठ लाखांचे कर्ज होते. त्यांनी त्यांनी मध्यरात्री दीडच्या सुमारास घरातील सर्वजण झोपलेले असताना स्वत:चे शेत गाठले. त्यानंतर पहाटे पावणे तीनच्या सुमारास त्यांनी आपल्या मुलासह जवळच्या चार नातेवाईकांना फोन करून ‘मी जग सोडतोय’ अशी माहिती दिली. त्यामुळे पाटील यांच्या कुटुंबियांनी तात्काळ धावाधाव करत आपले शेत गाठले. टॉर्चच्या प्रकाशात कुटुंबियांनी शेताच्या दिशेने धाव घेतली. तसेच रात्रीच्या अंधारातच शेतात शोधाशोध केली, त्यावेळी कडुनिंबाच्या झाडाला कैलास पाटील यांनी गळफास घेतल्याचे दिसले.
याप्रकरणी धरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. मृत कैलास पाटील यांच्या आत्महत्येमुळे गावात सर्वांनाच धक्का बसला आहे. या घटनेमुळे गावात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.