ते म्हणाले की, राज्य सहकारी बँकेशी शेतकऱ्यांचे जवळचे नाते असून शेतीवर अवलंबून असणारे अनेक उद्याेग या बँकेवर अवलंबून अाहेत. परंतु या बँकेने ८० टक्के कर्जपुरवठा केवळ एकाच व्यवसायासाठी अाणि २० टक्के शेतीसाठी दिला. केवळ १३ साखर कारखान्यांना एक हजार काेटींपेक्षा जास्त कर्ज या बँकेच्या संचालक मंडळाने दिले अाणि ते कारखाने त्यानंतरही डबघार्इला अाले. आघाडी सरकारच्या काळात ज्यांनी कारखाने डबघाईला आणले त्यांनीच ते परत विकत घेतले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या बँकेवर प्रशासक मंडळ नेमले होते. आता, आमच्या सरकारच्या काळात बँक नफ्यात आली आहे. त्यानंतर काही समाजसेवी संघटना कोर्टात गेल्या आणि कोर्टाने निर्णय दिला की भ्रष्टाचार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा. त्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे बँक आम्ही बरखास्त केली नाही किंवा गुन्हे आम्ही दाखल केले म्हणणे चुकीचे आहे. आम्ही फक्त उच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी केली. आज राष्ट्रवादी निवडणूक समोर ठेवून ही कारवाई केली, असे म्हणत असली तरी त्यांच्याच काळात सुरू झालेली चौकशी टप्प्याटप्प्याने पुढे गेली व आता गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांनी काही केलेच नसेल तर घाबरायचे कारण नाही. मोकळ्या मनाने त्यांनी चौकशीला सामोरे जावे,’ असा सल्लाही दानवे यांनी दिला.
‘भाजपमध्ये आलेल्या नेत्यांना निष्ठावंतांनी बैलासारखे शिंग मारू नये’
‘भाजप व शिवसेनेची युती निश्चित असून अधिकृत निर्णय पितृपक्ष संपल्यावर जाहीर होईल. भाजपत माेठ्या प्रमाणात मेगाभरती हाेत असली तरी त्याचा परिणाम जुन्या नेत्यांवर हाेणार नाही. दुसऱ्या पक्षातून कार्यकर्ते, नेते विचार करून भाजपत आलेले आहेत. पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांनी नवीन कार्यकर्त्यांना बैलासारखे शिंग मारू नये, तर त्यांना सांभाळून घ्यावे,’ असा सल्ला पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला.