मुंबई – मुंबईच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालयात मुंबई महापालिकेने भारतातील पहिलं ‘मुक्त पक्षी विहार’ दालन उभारलं आहे. प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून येत्या रविवारी २६ जानेवारी रोजी या पक्षी दालनाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, वस्त्रोद्योग मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख आणि पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत.
मुंबई महापालिकेने राणीच्या बागेत पाच मजली इमारतीत हे ‘मुक्त पक्षी विहार’ दालन निर्माण केलं आहे. या पाच मजली इमारतीत एकूण सहा दालनं आहेत. हे दालन उभारण्यासाठी दोन वर्ष लागली असून त्यात विविध प्रजातींचे १०० पक्षी एकत्रित नांदणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांना पक्ष्यांना जवळून न्याहाळण्याची संधी मिळणार आहे. इतर ५ दालनांमध्ये नव्यानेच आगमन झालेल्या बिबट्या, अस्वल, तरस, कोल्हा, कासव यांना ठेवण्यात येणार आहे. हे प्राणी अधिक जवळून व चांगल्या पद्धतीने बघता यावेत, यासाठी या दालनांच्या दर्शनी भागात वैशिट्यपूर्ण काच बसविण्यात आल्याने सेल्फी प्रेमींना देखील प्राण्यांसोबत फोटो काढण्याचा आनंद अधिक चांगल्या प्रकारे लुटता येणार आहे.
















