मुंबई-शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज रस्त्यावर उतरून राज्यभर निदर्शने केली. बारामती आणि इंदापूरमध्ये कडकडीत बंद पाळतानाच रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शनेही करण्यात आली. पुणे, नाशिक, बीड, परळीसह ठाणे आणि मुंबईतही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने, रास्तारोको आणि मूक मोर्चा काढत सरकारविरोधात संताप व्यक्त केला. मुंबईत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ईडी कार्यलयासमोर आंदोलन केल्याने या आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर जोरदार लाठीचार्ज केला.
शरद पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने राष्ट्रवादीने तीव्र संताप व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आज सकाळीच ईडी कार्यालयावर धडक मोर्चा नेऊन सरकारविरोधात घोषणाबाजी देत निदर्शने केली. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केल्याने या परिसरात एकच गोंधळ निर्माण झाला होता. पोलिसांनी आंदोलकांना ईडीच्या कार्यालयाबाहेरून हटवून त्यांची धरपकड केली.
नाशिकमध्येही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना-भाजपच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केलं. परळीतही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आंदोलनं करत निदर्शने करण्यात आली. तसेच येत्या २६ सप्टेंबर रोजी परळी बंदची हाकही देण्यात आली.