गडचिरोली – पत्नीची हत्या केल्यानंतर त्याने नदीवर जाऊन आंघोळ केली आणि रक्ताने माखलेले कपडे धुतले. तेथून त्याने सरळ पोलिस ठाणे गाठून संपूर्ण पत्नीची हत्या केल्याचा घटनाक्रम सांगत गुन्ह्याची कबुली दिली त्यामुळे पोलिसही हादरून गेले. पोलिसांनी आरोपीला लागलीच अटक करून घेत चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा येथील ही खळबळजनक घटना असून शिवसेना ठाकरे गटाच्या युवती सेना शहरप्रमुख राहत ताहेमीम शेख (वय ३०) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. पती ताहेमीम वजीर शेख याने चाकूने सपासप वार करून पत्नीची निर्घृण हत्या केली.
पोलिसांच्या माहितीनुसार, ताहेमीम वजीर शेख (वय ३८) असे आरोपी पतीचे नाव आहे. तो मूळचा रजेगाव (जि. गोंदिया) येथील आहे. मात्र लग्नानंतर पत्नी राहत शेख समवेत कुरखेडा येथील आंबेडकर वॉर्डात सासरवाडीत राहत होता. त्यांना ८ व ५ वर्षे वयाची दोन आपत्ये आहेत. तो पत्नीच्या चारित्र्यावर नेहमीच संशय घेत असे. १४ सप्टेंबरला रात्री याच कारणावरून दाम्पत्यात याच कारणावरून कडाक्याचे भांडण झाले. पहाटे अडीच वाजता राहत यांची पतीने चाकूने भोसकून हत्या केली. पोटात, गळ्यावर त्याने निर्दयीपणे वार केले. यात राहत यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, यावेळी घरात राहत, त्यांचा पती ताहेमीम वजीर व दोन मुले असे चौघेच होते. मुले झोपेत असताना हा थरार घडला.
दरम्यान, तब्येत बरी नसल्याने राहत यांचे वडील नजत सय्यद उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत होते, त्यांची पत्नीही सोबत दवाखान्यात होती. पहाटे चार वाजता चहा घेण्यासाठी नजत सय्यद हे घरी आल्यावर त्यांना मुलीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला. त्यांच्या फिर्यादीवरून ताहेमीम वजीर शेखविरुद्ध कुरखेडा ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो.नि. संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक वर्षा बोरसे, एस. आर. अवचार तपास करत आहेत