अमरावती : अमरावती जिल्ह्यातील बेनोडा शहीद पोलिस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या श्री क्षेत्र झुंज येथील वर्धा नदीत बोट उलटून 11 जण बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान, घटनेतील मृतकांपैकी तिघांचे मृतदेह हाती लागले असून इतरांचा शोध सुरू आहे. ही बोट नेमकी कशी बुडाली याबाबतची माहिती मिळू शकलेली नाहीये.
एकाच कुटुंबातील 11 जण गाडेगाव येथील मटरे कुटुंबीयांकडे दशक्रियेच्या विधीसाठी आले होते. दशक्रियेचा कार्यक्रम आटोपल्यानंतर मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास वरुडकडे फिरायला गेले. त्यावेळी महादेवाच्या दर्शनासाठी वर्धा नदीतून बोटीने जात होते.
अचानक नाव उलटली आणि अकराही जण बुडाले. यामध्ये बहीण, भाऊ, जावई यांचा समावेश आहे. सर्वांना जलसमाधी मिळाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अद्याप तिघांचे मृतदेह हाती लागले असून यामध्ये नावाड्यासह एक महिला आणि एका चिमुकलीचा समावेश आहे. स्थानिकांच्या मदतीने इतरांचा शोध सुरू आहे.