नवी दिल्ली : हरियाणातील फरिदाबाद शहरात बीएच्या शेवटच्या वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीची हत्येनंतर मृतदेह आग्रा कॅनॉलच्या झुडपात फेकून देण्यात आला. या घटनेने खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे 50 वर्षीय संशयित आरोपी हा तरुणीच्या आजोबांचा मित्र आहे.
मयत विद्यार्थिनीच्या मावशीने सांगितले की, पीडिता तिच्या आजीच्या घरी जायला निघाली होती, पण ती तिथे न पोहोचल्यामुळे शोधाशोध सुरु झाली. त्याच वेळी आरोपीने मुलीच्या कुटुंबीयांना फोन करुन माहिती दिली. पण मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या केल्याचे त्याने सांगितले. जवळपास आठवड्याभरापासून बेपत्ता असलेल्या तरुणीचा मृतदेह पोलिसांना सातव्या दिवशी नाल्यात सापडला.
पीडितेच्या आजीच्या घरी आजोबांचा मित्र सिंहराजचा फोन आला. 50 वर्षीय संशयित आरोपी सिंहराज हा सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. पीडितेच्या कॉल रेकॉर्डमध्ये शेवटचा फोन सिंहराजचा असल्यामुळे पोलिसांचा संशय बळावला आहे.
आरोपीचा शोध सुरु
आपण तरुणीसोबत दुष्कृत्य करुन तिची हत्या केल्याचं आरोपीने सांगितलं. त्यानंतर त्याने आपला फोन स्विच ऑफ केला. पोलिसांनी आग्रा कॅनॉलच्या झुडपातून तरुणीचा मृतदेह सापडला. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल करुन पोलिसांनी तपास सुरु केला आहेत. पोलिसांना या प्रकरणी पुरावे सापडले असून आरोपीला लवकरच अटक केली जाईल, असं त्यांनी सांगितलं.