पाचोरा : तालुक्यातील नेरी येथील १३ वर्षीय मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. ओम गणेश पाटील (१३) असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत सविस्तर असे की, शेतकरी गणेश पाटील यांच्या शेतात मजूर काम करीत असताना मजुरांना पाणी देण्यासाठी मुलगा ओम हा जात होता. महापुरामुळे शेतात विद्युत तार पडलेली होती. या तारेला ओम याचा स्पर्श झाल्याने विजेचा झटका बसला. त्याला चाळीसगाव येथे उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. ओम हा एकुलता मुलगा होता. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. तीन-चार दिवसांपूर्वी परिसरात झालेला पाऊस आणि नदीला आलेल्या पुरामुळे अनेक ठिकाणी विद्युत पोल जमिनीवर पडलेले आहेत. गणेश पाटील यांच्या शेतातदेखील विद्युत तार पडलेली होती. या तारेचा विद्युत पुरवठा सुरूच होता. यामुळे ही घटना घडल्याचा आरोप त्याच्या नातेवाइकांनी केला आहे.