जळगाव प्रतिनिधी । जळगावात घरफोडीच्या उद्देशाने फिरत असलेल्या एका युवकाला आज एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. ऋषीकेश किशोर विजयवारी (वय-२२) असे ताब्यात घेतलेल्या तरूणाचे नाव आहे. दरम्यान, त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत असे की, पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या पथकातील पोहेकॉ विनोद बोरसे, पो.ना. हेमंत कळसकर, पो.कॉ. साईनाथ मुंढे आणि पो.कॉ. सतीष गर्जे हे कर्मचारी आज गुरूवार ३ सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजता सुप्रीम कॉलनी परिसरातील गितांजली कंपनीजवळ पेट्रोलिंग करत असतांना एक तरूण संशयास्पद रित्या व हालचाली करत फिरतांना दिसून आला.
परिसरात कोणत्या कारणासाठी फिरत आहे असे विचारल्यानंतर त्याने समाधान कारक उत्तर दिले नाही. पोलीस जवळ येताच त्याने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला असता पोलीसांनी त्याचा पाठलाग करून ताब्यात घेतले. याप्रकरणी पो.कॉ. सतिष गर्जे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस कर्मचारी करीत आहे.