जळगाव,(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवार सकाळी एमआयडीसीतील फोर सिझन हॉटेलमध्ये रावेर लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेत तालुका निहाय मतदार संघाची पदाधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली.
रावेर लोकसभेतून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून उद्योजक श्रीराम पाटील हे निवडणूक लढवीत असून त्यांच्या प्रचारार्थ नियोजन, प्रमुख पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून आपल्या उमेदवाराला निवडून आण्यासाठी ताकद लावण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जळगावात बैठक घेतली.
बैठकीत पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्याकडे मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील प्रचाराची प्रमुख जबाबदारी सोपविण्यात आली असून जयंत पाटील यांनी एका बंद खोलीत विधानसभा मतदारसंघ, तसेच तालुकानिहाय पदाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र बैठका घेत प्रत्येकाचे मत जाणून घेतले. पक्षात अंतर्गत गटबाजी असेल तर ती इथेच संपवा, ही वेळ गटबाजीची नाही, असे सांगून त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या.
करण पवार, सावंतांनी घेतली भेट
बैठक सुरू असताना जळगाव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार करण पवार, तसेच उद्धवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी पाटील यांची भेट घेत, महाविकास आघाडीचे गणित मांडले. स्थानिक पातळीवर आपल्या स्तरावर पदाधिकाऱ्यांना सूचना देण्याची विनंती त्यांनी केली.
यावेळी माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, गुलाबराव देवकर, उमेदवार श्रीराम पाटील, विधानसभेचे माजी सभापती अरुण गुजराथी, रोहिणी खडसे, पक्ष निरीक्षक प्रसन्न पाटील, माजी आमदार अरुण पाटील, जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, डी. के. पाटील आदी यावेळी उपस्थित होते. बैठक आटोपून जयंत पाटील दुपारी १२:३० वाजता हेलिकॉप्टरने नाशिककडे रवाना झाले.










