पाचोरा – पतीस शेजारच्यांनी आत्महत्येला प्रवृत्त केल्याची फिर्याद मयताच्या पत्नीने पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये २४ एप्रिल रोजी दिल्यावरून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ३१ मार्च रोजी रात्री ८:३० वाजता जारगाव (ता. पाचोरा) येथे घडली होती. मात्र एक महिना उलटुनही संशयित आरोपी हे मोकाट फिरत असुन तात्काळ कारवाई करावी अशी मागणी मयताची पत्नी व भाऊ यांनी केली आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, जारगाव येथे भूषण नामदेव भोई याच्या घरासमोर बोंबील विक्रीच्या दुकानाच्या बाजूला राहणारे सिद्धार्थ उर्फ दादू आनंदा पाटील,
मंगलाबाई जुलाल पाटील, आनंदा जुलाल पाटील, सविता आनंदा पाटील (जारगाव) हे वारंवार कचरा टाकत असत. तसेच दुकानास अडथळा होईल, अशी त्यांची वाहने लावून ठेवत असत. यामुळे वारंवार भूषण भोई याच्याशी सिद्धार्थ पाटील वगैरे भांडण करत असत. ३१ मार्च रोजी भूषण हा समजावून सांगायला गेला असता त्यास आनंदा पाटील व अन्य चौघांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली. यावेळी त्यांची पत्नी मध्यस्थी करायला गेली असता तिलाही मारहाण करण्यात आली. यामुळे वैतागलेल्या भूषण याने राहत्या घरी गळफास घेतला. त्याच्यावर उपचार करण्यात आले. मात्र त्याची तब्येत खालावतच होती. १७ एप्रिल रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास अचानक त्रास होऊ लागला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. शेजारच्यांच्या त्रासाला कंटाळून पतीचा मृत्यू झाल्याची फिर्याद पत्नी अर्चना भोई हिने पाचोरा पोलिसात दिली आहे. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल असुन अद्याप पर्यंत घटनेतील संशयित चारही आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी मयताची पत्नी व भाऊ यांनी केली आहे.










