प्रतिनिधी I जळगाव- दीपस्तंभ फाऊंडेशन मनोबलच्या २५० दिव्यांग, अनाथ आणि वंचित विदयार्थ्यांनी पीव्हीआर मल्टीप्लेक्स मध्ये “श्रीकांत” या चित्रपटाचा आनंद घेतला. जन्मतः अंधत्व वाट्याला आलेलं असतांना आलेल्या संकटाचं संधीमध्ये रुपांतर करत वाटचाल करणाऱ्या ‘श्रीकांत बोला’ या दृष्टिबाधित व्यक्तीची हि प्रेरणादायी कथा आहे. पुण्याचे बांधकाम व्यवसायिक रवींद्र लुंकड आणि जळगावचे इंजिनीयर एम.एम.पाटील यांनी जळगाव व पुणे येथील मनोबल प्रकल्पातील दिव्यांग, प्रज्ञाचक्षू आणि अनाथ विद्यार्थ्यांसाठी ‘श्रीकांत’ या चित्रपटाचा विशेष शो आयोजित केला होता.
“श्रीकांत हा चित्रपट बनविण्याच्या प्रक्रियेतील सर्वांनाच मनापासून धन्यवाद दिले पाहिजे. या चित्रपटामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल. समाजामध्ये दिव्यांगांबद्दल आणि त्यांच्या क्षमतांबद्दल अजूनही मोठ्या प्रमाणात गैरसमज आहे, ते गैरसमज दूर होण्यास मदत होईल. सर्वसमावेशक सुसंस्कृत समाजाच्या निर्मितीमध्ये सर्व प्रकारचे दिव्यांग आणि इतरही प्रवाहात नसलेले घटक असणे अत्यावश्यक आहे. त्या सर्वांनाच सर्व संधी मिळाल्या पाहिजेत, त्यांच्यासाठी व्यवस्था निर्माण व्हायला हव्यात याबाबतीत जागरूकता होईल. दिव्यांग आपलेच भाऊ-बहीण, मित्र मैत्रिणी आहेत ही जाणीव या चित्रपटामुळे होईल, त्यांच्याशी कसे वागावे आणि कसे वागू नये याबाबतीत या चित्रपटामुळे प्रबोधन होण्यास मदत होईल”, अश्या भावना या प्रसंगी यजुर्वेंद्र महाजन यांनी व्यक्त केल्या.
“आयुष्यात कितीही संकटे आली तरी त्यांना न घाबरता त्यांना सामोरे जाऊन जिद्दीने लढले पाहिजे, यश हमखास मिळतेच हे या चित्रपटाच्या माध्यमातून आज शिकायला मिळाले”, अश्या भावना मनोबलची प्रज्ञाचक्षू विद्यार्थीनी पूजा ओझा हिने या वेळी व्यक्त केल्या.
मनोबलचा प्रज्ञाचक्षू विद्यार्थी करण गायकवाड म्हणाला कि,”दिव्यांगांच्या प्रति समाजाचा दृष्टीकोन सहानुभूतीचा आणि दयेचा असतो, पण हा चित्रपट बघून समाजाचा तो दृष्टीकोन नक्कीच बदलेल. प्रज्ञाचक्षू व्यक्तींना चित्रपट कळायला खूप अडचण होते, पण हा चित्रपट दिव्यांगांना कळेल अश्या पद्धतीने ऍक्सेसेबल केल्यामुळे अनेक दिव्यांगांना त्याचा आनंद घेता येणार आहे”
या प्रसंगी संस्थेचे संचालक राजेंद्र पाटील, डॉ. किरण देसले, सम्राट माळवदकर, विद्या भालेराव उपस्थित होते.










