मुंबई । शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून भाजपवर पुन्हा निशाणा साधला आहे. ब्रिटिशांना जे हवे होते, मोगलांना जे घडवायचे होते ते भाजपवाले मराठीजनांकडूनच घडवू पाहत आहेत. फोडा, झोडा आणि मजा पाहत राज्य करा, अशी भाजपची नीती आहे. शिवतीर्थावरच दोन तट पाडून कमळाबाईचा भाजप आज आनंदाने नाचत आहे, कमळाबाईचे हेच तर मिशन होते. ज्यांचे पक्ष कमिशनखोरीच्या मलिद्यावर तरारले आहेत त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार? पण हे राज्य शिवरायांचे आहे, असं म्हणत शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला आहे.
बुलढाण्यात शिवसेनेतील दोन गटांत हाणामाऱ्या झाल्या. कोण कुठला शिंदे गट व शिवसैनिक एकमेकांच्या अंगावर चाल करून गेले. आपापसात डोकी फुटली. एकमेकांचे कपडे फाटले. यात भाजपचे काय गेले? गमावले ते कष्टकरी मराठी माणसाने त्याच्या एकीची वज्रमूठ जी शिवरायांच्या भगव्या झेंडयाखाली एकवटली होती त्या वज्रमुठीच्या ठिकऱया करून भाजप मजा पाहात आहे. हे फक्त बुलढाण्यातच घडले काय? हे महाराष्ट्रात जागोजाग घडवले जात आहे. शिवसेना पडून त्यांनाच आपापसात झुंजवून संपवायचे. यात आजच्या बेइमानांना क्षणिक लाभ झाला, पण महाराष्ट्र फुटतोय त्याचे काय? आम्ही पाहिले कुठे तरी मंत्री दादा भुसेंच्या विरोधात घोषणा देत, त्यांना काळे झेंडे दाखवीत लोक त्यांच्यावर चाल करून गेले. या झुंजी भाजपने लावल्या आहेत व मराठी माणूस त्यांच्या हातातील मोहरा बनला आहे. आता काय तर म्हणे त्यांचे ‘मिशन मुंबई’ सुरू झाले आहे! हे मिशन मुंबई म्हणजे दिल्लीच्या बादशाहीचे ‘कमिशन मुंबई’ आहे असे शिवसेनेनं म्हंटल.
हे पण वाचा :
अल्पवयीन मुलांसाठी SBI देतेय खाते उघडण्याची सुविधा, जाणून घ्या कोणते फायदे मिळणार?
..म्हणून भाजपचे खा.नवनीत राणा उद्या जळगाव शहरात येणार
फक्त 122 रुपयांच्या छोट्या गुंतवणुकीसह 26 लाख रुपयांचा निधी मिळवा! जाणून घ्या ‘या’ पॉलिसीबद्दल?
Video : मालगाडीचं इंजिन घुसले थेट शेतात ; मोठा अनर्थ टळला
मुंबईतील मराठी माणसांत फूट पाडायची. त्यासाठी सत्ता आणि पैशांचा वारेमाप उपयोग करायचा. हा त्यांचा कावा. आमचे शिवतीर्थ व त्यांचे शिवतीर्थ वेगळे आहे. आम्ही शिवतीर्थी दसरा मेळावा घेऊन विचारांचे सोने लुटू नये, 56 वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुखांनी सुरू केलेली दसरा मेळाव्याची महान परंपरा खंडित व्हावी यासाठी त्यांचे ‘मिशन’ सुरू आहे. काय तर म्हणे शिवतीर्थावर दसरा मेळावा कोणी घ्यायचा याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे घेतील, असे ‘कमळाबाई’ मानभावीपणे सांगते. अरे सडक्या मेंदूच्या राज्यकर्त्यांनो, तुम्ही गोधडी भिजवत होता तेव्हापासून शिवसेना शिवतीर्थावर दसरा मेळाव्यांचे सीमोल्लंघन करीत आली आहे.
महाराष्ट्राची जनता जागती आहे हे देशाला दाखविणारा एक सोहळा असतो, पण हा दसरा मेळावा म्हणे आता कोण कुठला बाटग्यांचा शिंदे गट घेणार. म्हणून शिवसेनेचा दसरा मेळावा होणार की नाही ? अशी चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा म्हणजे ‘बेइमानांचा, ‘सुरती’ बाजारबुणग्यांचा मेळा नसतो. तो असतो अस्सल ज्वलंत मऱहाठी हिंदुत्व अभिमान्यांचा उसळता जनसागर. दसरा मेळाव्याचे शिवतीर्थाशी एक नाते आहे. हे नाते तोडणाऱयांच्या 56 पिढय़ा खाली उतरल्या तरी त्यांना ते शक्य होणार नाही. सर्वोच्च न्यायालय आम्ही मॅनेज केले अशी भाषा करणारे एक वेळ भाडय़ाची गर्दी जमवून स्वतःचा जयजयकार करतीलही, पण असे हवेतले बुडबुडे येतात आणि फुटतात. इतिहासात असे अनेक तोतये निर्माण झाले व गांडुळांप्रमाणे नष्ट झाले. न्याय विकत घ्याल, पण जनमताचा उसळता सागर, जो शिवतीर्थावर लोटत असतो तो सागर कसा विकत घेणार? अशा शब्दात सामनातून भाजपवर निशाणा साधण्यात आला.
शिवतीर्थावरच दोन तट पाडून कमळाबाईचा भाजप आज आनंदाने नाचत आहे, पण ते स्वप्नरंजनात दंग आहेत. गुजरातमध्ये अलीकडे मोठय़ा प्रमाणात चरस गांज्यांचे पीक आले आहे. त्या चोरटया गांजांची नशा मिशन मुंबईवाल्यांना चढली असेल तर शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यातच ती उतरविण्याचे बळ आई जगदंबेने महाराष्ट्रीय मनगटात दिले आहे. मराठी माणूस आपसात लढवला जात आहे. कमळाबाईचे हेच तर मिशन होते. ज्यांचे पक्ष कमिशनखोरीच्या मलिद्यावर तरारले आहेत त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार? पण हे राज्य शिवरायांचे आहे. येथे बाळासाहेब ठाकरे यांनी स्वाभिमानी मर्द मावळे घडवले, ते मेल्या आईचे दूध प्यायलेले नाहीत याचे भान राखा! बाकी सारे शिवतीर्थावरच !
















