मुंबई : आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेसेनेकडून बुधवारी स्टार प्रचारकांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली. या यादीत पक्षाचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातील आणि केंद्रातील अनेक वरिष्ठ नेते, मंत्री, खासदार, आमदार, प्रवक्ते तसेच विविध सेलचे पदाधिकारी यांचा समावेश आहे.

या स्टार प्रचारकांच्या यादीत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रमुख स्टार प्रचारक म्हणून निवड करण्यात आली असून, त्यांच्या माध्यमातून शहरी भागात पक्षाचा प्रचार अधिक प्रभावीपणे राबवला जाणार आहे. शिंदेसेनेने महानगरपालिका निवडणुकांसाठी ताकदवान नेतृत्व आणि लोकप्रिय चेहऱ्यांवर भर दिल्याचे या यादीतून स्पष्ट होत आहे.
स्टार प्रचारकांच्या यादीत ज्येष्ठ नेते रामदास कदम, गजानन कीर्तिकर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे, मीनाताई कांबळी यांचा समावेश आहे. तसेच मंत्री दादा भुसे, उदय सामंत, शंभूराज देसाई, संजय राठोड, भरत गोगावले, संजय शिरसाट, प्रकाश आबिटकर, प्रताप सरनाईक, राज्यमंत्री आशिष जयस्वाल आणि योगेश कदम यांची नावेही या यादीत आहेत.
याशिवाय माजी मंत्री दीपक केसरकर, डॉ. दीपक सावंत, खासदार श्रीरंग बारणे, नरेश म्हस्के, रवींद्र वायकर, मिलिंद देवरा, माजी खासदार राहुल शेवाळे, आमदार डॉ. मनीषा कायंदे, आमदार निलेश राणे, प्रवक्ते संजय निरूपम, राजू वाघमारे, डॉ. ज्योती वाघमारे, युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, सचिव राहुल लोंढे आणि राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एन.सी. यांचाही स्टार प्रचारक म्हणून समावेश करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, चित्रपट अभिनेता गोविंदा यांनाही स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान देण्यात आल्याने निवडणूक प्रचारात मनोरंजन आणि जनसंपर्काचा वेगळा रंग दिसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिंदेसेनेच्या या व्यापक आणि प्रभावी स्टार प्रचारकांच्या फळीमुळे महानगरपालिका निवडणुकांमध्ये पक्षाचा प्रचार अधिक आक्रमक आणि व्यापक होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.















