जळगाव | नजरकैद न्यूज – जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ३ मधून अपक्ष उमेदवार व माजी नगरसेविका सौ. मीनताई धुडकु सपकाळे यांच्या प्रचारार्थ भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रचार रॅलीला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला असून, परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. विशेषतः महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती ही रॅलीचे वैशिष्ट्य ठरली.यावेळी धुडकुभाऊ सपकाळे, विक्की शालिकआप्पा सोनवणे, संजय सपकाळे यांच्या उपस्थित शेकडो समर्थक रॅलीत सहभागी झाल्याचे दिसून आले.

या प्रचार रॅलीची सुरुवात वाल्मिक नगर परिसरातील महर्षी वाल्मिक यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून करण्यात आली. त्यानंतर रॅलीने विविध भागांतून मार्गक्रमण केले. सौ. मीनताई सपकाळे यांनी महर्षी वाल्मिक यांच्या विचारांना अभिवादन करत सर्वसामान्य नागरिकांच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
रॅलीदरम्यान वाल्मिक नगर, जैनाबाद परिसर, मेस्को माता नगर, हरिओम नगर, गुरुदत्त कॉलनी, मोहन टाकी परिसर, आंबेडकर नगर, गोपाळपुरा तसेच श्रीकृष्ण नगर या भागांतून प्रचार करण्यात आला. प्रत्येक ठिकाणी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत उमेदवारांचे स्वागत केले. अनेक घरांमधून औक्षण करून व फुलांची उधळण करत नागरिकांनी आपला पाठिंबा व्यक्त केला.
माजी नगरसेविका म्हणून आपल्या मागील कार्यकाळात केलेल्या विविध विकासकामांच्या जोरावर पुन्हा एकदा माय-बाप जनता आपल्याला सेवेची संधी देईल, असा विश्वास सौ. मीनताई सपकाळे यांनी व्यक्त केला. तसेच भविष्यातही प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने काम करत राहू, नागरिकांच्या सुख-दुःखात कायम सहभागी राहू, असे आश्वासन त्यांनी दिले.
या भव्य रॅलीमुळे प्रभाग क्रमांक ३ मधील निवडणूक प्रचाराला चांगलाच वेग आला असून, अपक्ष उमेदवार मीनताई धुडकु सपकाळे यांना मिळणारा वाढता जनसमर्थन आगामी निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.









