मुंबई – करोनाची लागण झालेले रुग्ण पुण्यात आढळून आल्याने पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील शाळा, महाविद्यालये आजपासून बंद ठेवण्यात येणार आहेत, मात्र तेथील दहावीच्या परीक्षा सुरू राहणार आहेत. मुंबईतल्या शाळा, महाविद्यालयेही सुरू राहणार आहेत. दहावी, बारावीच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत ही घोषणा केली. करोना व्हायरसची लागण मुंबई आणि पुण्यात झालेली आहे. पुण्यातील करोना रुग्णांची संख्या १०वर; ३११ रुग्ण देखरेखीखाली ठेवण्यात आले आहेत. ही परिस्थिती लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील शाळा पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.