मुंबई – भारतीय संविधानाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने मोहीम उघडली आहे. विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच संविधानाची माहिती मिळावी म्हणून इयत्ता पाचवीपासून ते दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात संविधानाच्या मूलभूत कर्तव्यांसह काही अनुच्छेदांचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या मुंबई सचिव स्नेहल कांबळे यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे. तसेच संविधानाची अंमलबजावणी शालेय स्तरावर करण्याबाबतचा एक अहवालही शिक्षण मंत्र्यांकडे देण्यात आला आहे. संविधानातील भाग ४मधील अनुच्छेद ५१ अ म्हणजेच मूलभूत कर्तव्य इयत्ता पाचवी ते दहावीच्या सर्व पुस्तकांमध्ये पहिल्या पानांवर छापावीत, इयत्ता आठवी ते नववीच्या अभ्यासक्रमात संविधान भाग ३ आणि ४ मधील सर्व अनुच्छेदांचा समावेश करावा, अनुच्छेद १२ ते ५१ अ यांचाही समावेस करावा, अशी मागणी करतानाच इयत्ता आठवी आणि इयत्ता नववीसाठी कोणत्या अनुच्छेदांचा अभ्यासक्रमात समावेश असावा याची विस्तृत माहितीही या अहवालात देण्यात आली आहे.
आगामी शैक्षणिक वर्षांपासून म्हणजे जून २०२०पासून शालेय अभ्यासक्रमात या अनुच्छेदांचा समावेश करण्याची मागणीही करण्यात आली आहे. डिजिटल पद्धतीने हा अभ्यासक्रम शिकवण्याबरोबरच प्रत्येक विषयानुरूप अभ्यासक्रमाची चित्रफित बनवावी, तसेच विद्यार्थ्यांची लेखी आणि तोंडी परीक्षा घेऊन गुणांकन पद्धतीने त्यांना श्रेणी देण्याचेही मागणी यावेळी करण्यात आली आहे. संविधानाबद्दलची जागृती होणे गरजेचं आहे. आपले मूलभूत हक्क आणि कर्तव्य आजच्या पिढीला माहित असणे आवश्यक आहे. शिवाय संविधानाच्या अभ्यासाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना कायद्याचं ज्ञानही मिळेल, त्यामुळे सर्व शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घेऊन शालेय अभ्यासक्रमात संविधानाच्या काही भागांचा समावेश करण्यावर भर दिला पाहिजे, असं आवाहन विद्यार्थी नेत्या स्नेहल कांबळे यांनी केलं आहे.