मुंबई- ठाकरे सरकारने राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना खास गिफ्ट दिले आहे. पाच दिवसांचा आठवडा जाहीर करुन सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना खुश केलं. पण, यावरुन आता सत्ताधारी महाविकासआघाडीतील काँग्रेस नेत्याकडूनच या निर्णयाला विरोध झाला आहे. पाच दिवस आठवड्याचा निर्णय निर्बुद्धपणाचा असल्याचा घणाघात काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी केला.
संजय निरुपम यांनी सुरुवातीपासूनच महाविकास आघाडीला घरचा आहेर देण्याची परंपरा पाळली आहे. “राज्य सरकारी कर्मचार्यांसाठी पाच दिवसांचा सप्ताह करण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय मूर्खपणाचा आहे. दर आठवड्याला दोन सुट्ट्या घेण्यात काय अर्थ आहे? सरकारी कर्मचारी आळशीपणासाठी आधीच कुप्रसिद्ध आहेत. आपण त्यांच्या कामचुकारपणासाठी त्यांना बक्षीस देत आहोत का?” असा प्रश्न संजय निरुपम यांनी ट्विटरवरुन केला आहे.
29 फेब्रुवारीपासून राज्यातपाच दिवसांचा आठवडा
राज्यातील शासकीय कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. आता केंद्राप्रमाणे राज्यातील शासकीय कार्यालयांना प्रत्येक महिन्यातील सर्व शनिवार व रविवारी सुटी राहील. यासोबतच दररोज 45 मिनिटांचे वाढीव काम अधिकारी व कर्मचाऱ्यांना करावे लागेल. या निर्णयाची अंमलबजावणी 29 फेब्रुवारीपासून होईल. ज्या शासकीय कार्यालयांना कारखाना अधिनियम किंवा औद्योगिक विवाद लागू आहे किंवा ज्यांच्या सेवा अत्यावश्यक म्हणून समजल्या जातात, अशा कार्यालयांना पाच दिवसांचा आठवडा लागू नाही.














