नागपूर – मागील लोकसभा निवडणुकीत नागपूर मतदारसंघात मतदान यंत्रात भाजपनं तांत्रिक बिघाड करून अधिकाधिक मतदान नितीन गडकरी यांनाच होईल, अशी व्यवस्था केल्याचा आरोप करत त्यांच्या निवडणुकीला आव्हान देणारी बसप नेते मनोहर डबरासे यांची याचिका मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं फेटाळली. त्यामुळं गडकरी यांना दिलासा मिळाला आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवडणुकीला आव्हान देणारी याचिका मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं मंगळवारी फेटाळली. बसपचे मनोहर डबरासे यांनी गडकरी यांच्या निवडणुकीला आव्हान देणारी याचिका हायकोर्टात दाखल केली होती. डबरासे यांच्या याचिकेनुसार, लोकसभा निवडणुकीत नागपूर मतदारसंघातील इव्हीएममध्ये भाजपनं तांत्रिक बिघाड करून अधिकाधिक मते गडकरी यांनाच मिळतील अशी सोय केली होती. त्यामुळं इतर उमेदवारांना मिळालेली मतं केवळ गडकरी यांनाच मिळाली, असा आरोप करण्यात आला. तसंच मतमोजणीत देखील तफावत आढळून आली असल्याचा दावा करण्यात आला. मात्र नितीन गडकरी यांनी याचिकेतील आरोप फेटाळले. तसेच डबरासे यांच्या याचिकेवर लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम ११७ अन्वये हरकत घेऊन, सबळ पुरावे दाखल करण्याची मागणी केली. परंतु याचिकाकर्त्याला पुरावे सादर करता आले नाहीत. त्यामुळं हायकोर्टानं याचिका फेटाळून लावली.