मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घुसखोर पाकिस्तानी, तसेच बांगलादेशींना देशातून हुसकावून लावण्याच्या मागणीसाठी ९ फेब्रुवारीला मोर्चा आयोजित केला आहे. मनसेच्या या नियोजित मोर्चाच्या प्रस्तावित मार्गाला नकार देत पोलिसांनी मनसेला धक्का दिला आहे. भायखळा ते आझाद मैदान या मार्गावरून मोर्चा काढण्यास पोलिसांनी परवानगी नाकारताना मनसेच्या मोर्चाला मरिन ड्राइव्ह ते आझाद मैदान या मार्गावरून मोर्चा नेण्याची परवानगी दिली आहे.
कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी भायखळा ते आझाद मैदान असा मोर्चाचा मार्ग नाकारला आहे. हा मार्ग नाकारताना पोलिसांनी मनसेला पर्यायी मार्ग सुचवला आहे. पोलिसांची ही सूचना मनसेने मान्य केली असून मनसेचा ९ फेब्रुवारीचा हा मोर्चा मरिन ड्राइव्ह ते आझाद मैदान असा निघणार आहे. मनसेकडून या नव्या मार्गाचे पोस्टरही प्रसिद्ध करण्यात आले आहे.
भायखळा ते आझाद मैदान या मार्गालगत मुस्लिम धर्मियांची मोठी वस्ती आहे. देशात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात मुस्लिम समाजही रस्त्यावर उतरला आहे. मोर्चा मुस्लिमबहुल भागातून गेल्यास याचा काही समाजकंटक फायदा उचलण्याचा प्रयत्न करू शकतात. यामुळे मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच कारणामुळे पोलिसांनी मनसेला हा मार्ग नाकारला आहे.
मनसेच्या पहिल्याच अधिवेशनात हिंदुत्त्वाचा ठळकपणे पुरस्कार करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घुसखोर पाकिस्तानी आणि बांगलादेशींना विरोध केला. या वेळी त्यांनी पक्षाचा नवा झेंडाही लाँच केला. याच अधिवेशनात राज यांनी पाकिस्तानी, तसेच बांगलादेशी घुसखोरांना देशातून हुसकावून लावण्याच्या मागणीसाठी ९ फेब्रुवारीला मुंबईत मोर्चा आयोजित करण्याची घोषणा केली. त्यानंतर मनसेने बदलेला झेंडा, आणि प्रखर हिंदुत्वाच्या पुरस्काराची चर्चा सुरू झाली.